Pune District Corona Update: कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने ओलांडला एक हजारांचा टप्पा!

Pune District Corona Update: Corona death toll cross one thousand mark! शुक्रवारी विक्रमी 1,598 रुग्णवाढ, ग्रामीण भागात सर्वाधिक 65.46 टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात काल (शुक्रवारी) दिवसभरात एकूण 28 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बळींच्या आकड्याने एक हजारचा टप्पा ओलांडला. पुणे जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या 1,007 झाली आहे.

पुणे शहरात काल 14, पिंपरी-चिंचवडमध्ये 11 तर ग्रामीण भागात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 1007 झाला आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर 2.80 टक्के आहे. हा मृत्यूदर जागतिक, राष्ट्रीय व राज्याच्या मृत्यूदरापेक्षा बराच कमी आहे.

शुक्रवारी विक्रमी 1,598 रुग्णवाढ

शुक्रवारी पुणे जिल्ह्यात 1,598 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 997 वर जाऊन पोहचली आहे. शुक्रवारी पुणे शहरात 916, पिंपरी-चिंचवडमध्ये 496, ग्रामीण भागात 132 तर कॅन्टोन्मेंट बोर्ड व सिव्हील सर्जन यांच्या कार्यक्षेत्रात 54 रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे गुरुवारी 34 हजार 399 वर असणारी कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी 34 हजार 399 वर जाऊन पोहचली आहे.

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ग्रामीण भागात सर्वाधिक 65.46 टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

पुणे जिल्ह्यातील एकूण 35 हजार 997 पैकी 22 हजार 180 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्हातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 61.62 टक्के झाले आहे. पुणे शहरात 26 हजार 174 पैकी 16 हजार 188 (61.85 टक्के), पिंपरी-चिंचवडमध्ये 6,549 पैकी 3849 (58.77 टक्के) ग्रामीण भागात 3,274 पैकी 2143 (65.46 टक्के) रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.