Pune : अय्यंगार यांची जगाला योगाची अनमोल देणगी – डॉ. मुरली मनोहर जोशी 

एमपीसी न्यूज  : “बी. के. एस. अय्यंगार यांच्यासारखी माणसे, ही एक खास निर्मिती असते. त्यांनी मानवी कल्याणासाठी भारतीय पतंजली योगाची जगाला देणगी दिली, असे मत माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केले. योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या समारोप समारंभात जोशी बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिटय़ूटचे गीता अय्यंगार, प्रशांत अय्यंगार, हरीत श्रीधर आणि अभिजाता अय्यंगार यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडानगरी येथे पार पडला. कार्यक्रमात 50 देशांतील एक हजारांहून अधिक योग साधकांनी सहभाग घेतला.

डॉ. जोशी म्हणाले, “योग हे शास्त्र आहे. योगामुळे आपण उत्तम व्यक्ती बनू शकतो. आपल्या नेहमीच्या कामामध्ये उच्च क्षमता आणण्यासाठी योगाचा मोठा उपयोग होतो. योग हे अहिंसक असून, जगाशी जोडले जाण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे.”

योगाची पाश्चिमात्य जगाला अय्यंगार यांनीच ओळख करून दिली. अय्यंगार म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी देवाने तयार केलेली खास निर्मिती होती. अय्यंगार यांनी पतंजलीला २१ व्या शतकामध्ये आणले आणि पुढे नेले, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले, “अय्यंगार दैवी होते. ते आणि योग एकरूप झालेले होते. त्यांनी जगाला खऱ्या शास्त्रीय योगाची अनमोल भेट दिली आहे. अय्यंगार यांनी मानवी कल्याणासाठी, योगाचे, योगदान जगाला दिले असून, हे योगदान कायम सुरू राहीले पाहिजे.”

मुलगी निवेदिता हिच्या आजारपणात आम्ही अनेक उपचार पद्धतीचा अवलंब केला, पण त्याचा काहीच उपयोग न झाल्याने अय्यंगार यांच्याकडे आलो. त्यांच्यामुळे मुलीला खूप उपयोग झाल्याचे जोशी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांच्या गुढगे दुःखी संदर्भात अय्यंगार यांनी सल्ला दिला होता, असे जोशी यांनी सांगितले. जयप्रकाश नारायण यांनी अय्यंगार यांना दिल्ली येथे योग शिक्षण संस्था काढण्याचा 1947 मध्ये सल्ला दिला होता, तो आता प्रत्यक्षात साठी आपण कारणीभूत ठरल्याचेही जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओद्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

जगभरामध्ये उत्तम योगशिक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार हे बी. के. एस. अय्यंगार या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील बेल्लूर येथे 14 डिसेंबर 1918 रोजी झाला. भारत आणि जगामध्ये योग आणि योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 1991 साली पद्मश्री, 2002 साली पद्मभूषण तर 2014 साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. 20ऑगस्ट 2014 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी अय्यंगार यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला पुण्यात सुरुवात झाली असून, वर्षभर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रशांत अय्यंगार यांनी सांगितले. यावेळी अय्यंगार यांचे शिष्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.