Pune : कामावरून काढून टाकणाऱ्या आणि कामगारांचे वेतन न करणाऱ्या ‘अ‍ॅमडाॅक्स’ विरोधात कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना या विषाणूंच्या पार्श्वभूमीवर फुरसुंगी येथील ‘अ‍ॅमडाॅक्स’ या आयटी कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांचे वेतन देखील जमा केले नाही. याविरोधात कंपनीचे कार्मचारी व नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सेना यांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे कंपनी विरोधात तक्रार नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नॅशनल इनफॉरमेशन टेक्नोलॉजी, एमप्लॉइज सेना, आयटी, बीपीओ, केपीओ, अँड टेलिकॉम एमप्लॉइज ट्रेड युनियन यांनी गुरुवारी दि.(9) निवेदनाव्दारे फुरसुंगी येथील ‘अ‍ॅमडाॅक्स’ या आयटी कंपनीतील कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्याबाबत तसेच वेतन न देण्याबाबत कामगार उपायुक्त, शिवाजीनगर पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. कंपनीने केलेल्या या व्यवहाराबद्दल कारवाईची मागणी केली होती.

कंपनीने आपला नफा सुरळीत ठेवण्यासाठी हे केले असून सरकारचे नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे यांच्याविरोधात योग्य कारवाईची मागणी एम्प्लॉईज सेनाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, उपाध्यक्ष विवेक मिस्त्री व हरप्रीत सलुजा यांनी केली होती.

या निवेदनाची दखल घेत सरकारी कामगार अधिकारी डी. डी. पवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला महाराष्ट्र शासनाने (दि.31) मार्चला निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे अवलोकन करून व सदर तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा पूर्तता अहवाल कार्यालयाला त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.