Pune: मास्क आणि सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री; चार मेडिकल दुकाने सील!

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना विषाणूबाधित नऊ रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक मास्क व सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये गर्दी करीत आहेत. या परिस्थितीचा फायदा उठवत बहुतेक औषध विक्रेत्यांनी ग्राहकांची लूट सुरू केली आहे. वाढीव दराने मास्क व सॅनिटायझर विकून ग्राहकांची लूट करणाऱ्या चार औषध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.

पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, गोखलेनगर आणि म्हाळुंगे येथील ही मेडीकल स्टोअर आहेत.पुढील सूचना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश सबंधित दुकानदारांना देण्यात आले आहेत. 

_MPC_DIR_MPU_II

कोथरूड येथील मेट्रो मेडिकल, गोखले नगर येथील ओम केमिस्ट या दुकानात मास्कची विक्री वाढीव दराने होत होती. तर दुसरीकडे म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकल आणि कोथरूड येथील न्यू पूजा केमिस्ट या दुकानात बोगस सॅनिटायझरची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येइपर्यंत ही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

सॅनिटायझर खरेदी करताना त्याच्यावर तयार करण्याचा परवाना, उत्पादकाचा पत्ता याबाबत माहिती तपासूनच ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनी त्याची खरेदी-विक्री करावी. शिवाय मास्क आणि सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.