Pune : कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या दोघांची ओळख पटली; आर्थिक व्यवहारातून खून

एमपीसी न्यूज – पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी गावाजवळ कुंडलिका व्हॅली दरीत गुरुवारी (दि. 4) एका जळालेल्या कारमध्ये आढळलेल्या दोन व्यक्तींची ओळख पटली आहे. त्याबाबत पौड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आर्थिक व्यवहारातून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विजय आबा साळुंके (वय 32, रा. बांधा, ता. सावंतवाडी) आणि विकास विलास गोसावी (वय 28, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. सुभाष आबा साळुंके (वय 35, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अशोक देवु हिलम (रा. आदिवाडीवाडी वाकी, ता. माणगाव, जी. रायगड) आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष बांधा येथे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांचा भाऊ मयत विजय आणि दाजी विकास या दोघांचा अशोक हिलम याने आर्थिक व्यवहारातून खून केला. खून केल्यानंतर दोघांचा मृतदेह विजयच्या वॅगन आर (एमएच 07 / एजी 1477) कारमध्ये टाकले. ती कार मुळशी तालुक्यातील पिंपरी गावाच्या हद्दीत असलेल्या कुंडलिका व्हॅली दरीमध्ये ढकलून दिली. तसेच कार पेटवून पुरावा नाश्ता करण्याचा प्रयत्न केला आहे.

गुरुवारी (दि. 4) दरीमध्ये जळालेल्या अवस्थेत एक कार आढळून आली. पोलिसांनी कारमधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी दोन्ही मृतदेह ओळखण्यापलीकडे झाले होते. पोलिसांनी सुरुवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर दोघांची ओळख पटवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.