Pune : उद्योजकता विकास योजनांच्या अंमलबजावणीत ‘सीए’ची भूमिका महत्वाची- सदाशिव सुरवसे

एमपीसी न्यूज – कृषीनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. उद्योजकता विकासासाठी सरकारकडून अनेक योजना आणल्या जात असून या योजना प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा. औद्योगिक धोरणांचा अभ्यास करून नवीन उद्योजकांना मदत व मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य उद्योग विभाग व दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने ‘मेक इन इंडिया, स्टार्टअप आणि एमएसएमई धोरण’ यावर बिबवेवाडी येथील आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी सीए जी. बी. मोदी, सीए महेश्वर मराठे, आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लढ्ढा, सचिव व खजिनदार काशिनाथ पाठारे, विभागीय समितीचे खजिनदार सीए आनंद जाखोटिया, सीए यशवंत कासार, सीए रामचंद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरवसे पुढे म्हणाले, “लघु व माध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी सरकारकडून तशी धोरणे आखली जात आहेत. चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा, ई कॉमर्सचे व्यासपीठ विकसित केले जात आहे. उद्योगांसाठी राखीव क्षेत्र ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी योजना केल्या आहेत. या सरकारी योजनांची माहिती देण्यात व त्यांच्या अंमलबजावणीत ‘सीए’ची भूमिका मोलाची आहे.”

सीए जी. बी. मोदी यांनी ‘इंडस्ट्री सबसिडी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविक करत उद्योग विभागाकडून पहिल्यांदाच सीए आणि त्यांच्यासाठी या क्षेत्रात असणाऱ्या संधींबाबत कार्यक्रम झाल्याचे नमूद केले. सीए महेश्वर मराठे यांनी ‘स्टार्टअप’वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर लढ्ढा यांनी केले तर यशवंत कासार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.