Make In India: मराठमोळ्या अभियंत्याने बनवला कोविड रुग्णांची मदत करणारा रोबोट

Make In India: A robot helping Covid patients made by a Maharashtrian engineer कोरो-बॉट नर्सेस आणि बोर्ड बॉईज यांच्या संपर्काची गरज नाहीशी करतो. तो रुग्णांना अन्न-पाणी आणि औषधे पुरवण्याचे काम करतो.

एमपीसी न्यूज- कोविड-19 च्या काळात रुग्णांच्या सेवेत काम करणाऱ्या वॉर्ड बॉईज, परिचारिका यांचा मोठा ताण कमी करणारा रोबोट एका मराठमोळ्या अभियंत्याने बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’च्या हाकेने हा मराठमोळा अभियंता प्रेरित झाला होता, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. प्रतीक तिरोडकर असे या अभियंत्याचे नाव आहे.

वॉर्ड बॉईज, परिचारिका कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आघाडीवर असणारे आपल्या समाजातील कोरोना योद्धे आहेत. रुग्णांसोबत त्यांना सर्वात जास्त काळ व्यतीत करावा लागतो. त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेल्या प्रतीक तिरोडकरने ‘कोरोना रोबोट’ची निर्मिती केली.

कोरो-बॉट नर्सेस आणि बोर्ड बॉईज यांच्या संपर्काची गरज नाहीशी करतो. तो रुग्णांना अन्न-पाणी आणि औषधे पुरवण्याचे काम करतो. कॅमेर्‍याच्या मदतीने तो रुग्णांशी संवाद देखील साधू शकतो.

यात एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील आहे. तसेच त्यात सॅनिटायझर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर सहा ते आठ तास तो कार्यरत राहील.

इंटरनेटच्या माध्यमातून कार्यान्वित केला जाणार असल्याने त्याला अंतराचे बंधन नाही. प्रतिकने तयार केलेला आणि प्रत्यक्षात वापरात आलेला हा पहिलाच रोबो आहे.

अन्नपदार्थ, औषधे, फळे ठेवण्यासाठी ट्रेची रचना यामध्ये करण्यात आली आहे. साठवणुकीची व्यवस्थाही यात करण्यात आली आहे.

पाणी, औषधे, अन्न देणाऱ्या ट्रेमध्ये सेन्सर्स लावण्यात आले असून ते स्वयंचलितपणे हाताच्या हालचालीवर काम करतात यातून सुलभतेबरोबरच वस्तूंचा अपव्यय टळतो.

या रोबोमध्ये एलईडी लाईटच्या मदतीने प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी देखील काम करू शकतो. यावर एक छोटेसे संगणकवजा उपकरणही लावण्यात आले आहे. ज्यातून छोटी-मोठी कामे तसेच मनोरंजनाची सोय केली आहे.

लॉकडाउनच्या काळात रोबो बनवण्यासाठीची उपकरणे मिळणे अवघड झाले असल्याने प्रतीकने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने हा रोबो आकारास आणला आहे. त्यासाठी त्याला त्याच्या तीन ते चार सहकाऱ्यांची मदत झाली. रोबोटचे पार्ट बनवणारी दुकाने बंद असल्याने त्यांनी स्वतः ते पार्ट बनवले.

पंधरा ते वीस दिवसात बनलेला हा प्रायोगिक रोबो सध्या कल्याण येथील होली क्रॉस रुग्णालयात सेवा देत आहे.

प्रतीकला विश्वास आहे की, तो दर आठवड्याला दोन ते तीन रोबो बनवू शकतो. या रोगाच्या संचलनासाठी प्रतीक आणि त्याच्या टीमने एक स्पेशल अॅप बनवले आहे. त्याद्वारे इंटरनेटचा वापर करून या रोबोचे दूर ठिकाणावरून देखील संचालन करता येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.