Pune : भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखतींची औपचारिकता पूर्ण ; शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक इच्छुक तर कसब्यात चुरस

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघात गुरुवारी (दि. २९) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार असल्यामुळे या मुलाखती म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्या आहेत.

विद्यमान आठ आमदार, २३ नगरसेवक यांच्यासह ९२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये शिवाजीनगर मतदार संघासाठी सर्वाधिक ३१ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये आमदार विजय काळे यांच्यासहित विजय शेवाळे, नीलिमा खाडे, अर्चना मुसळे, ज्योत्स्ना एकबोटे, सिद्धार्थ शिरोळे या पाच नगरसेवकांचा समावेश होता. प्रत्येक विधानसभा मतदार संघामधील इच्छुकाना एकत्र बोलावून मतदारसंघामधील कार्याची माहिती विचारण्यात आली.

कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, धीरज घाटे, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, माजी नगरसेवक अशोक येनपुरे, दिलीप काळोखे यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. खासदार बापट यांची सून स्वरदा बापट या देखील कसाब मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

मात्र उमेदवारी कुणाला द्यायची, शिवसेनेला किती मतदारसंघ द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार असल्यामुळे या मुलाखती म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.