Pune : अनौपचारिक गप्पांमधून उलगडले मानसिक आरोग्याचे महत्व

आयपीएचतर्फे प्रसिध्द मनोविकार तज्ञांचा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज- मानसिक आजारावर लक्ष केंद्रित न करता मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. समाजात अनेकजण मानसिक व्याधीने पछाडलेले असतात त्यांच्याकडे वेद म्हणून न पाहता त्यांना मदतीची गरज आहे असा सूर नामवंत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केला. निमित्त होते ‘मनआरोग्य आणि समाज – दुरावा आणि आपुलकी’ या विषयावर आयोजित केलेल्या तीन प्रसिध्द मनोविकार तज्ञांचा अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाचे.

यामध्ये मॅगसेसे पुरस्कार मिळालेले डॉ. भरत वाटवानी, डॉ. हरीश शेट्टी (सामाजिक मनआरोग्य विशेषज्ञ), डॉ आनंद नाडकर्णी (मनोविकास तज्ञ) सहभागी झाले होते. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, पुणे च्या केंद्रप्रमुख व मनोविकारतज्ञ डॉ. सुखदा चिमोटे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

आजही समाजात आपल्याला शारीरिक आजार व मानसिक आजार यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात दरी आढळते. लोक अजूनही मानसिक आजाराच्या बाबतीत ‘अशास्त्रीय’ उपायांकडे वळतात. ही दरी सांधली जाणे कसे आवश्यक आहे, त्यासाठी कसे प्रयत्न चालू आहेत इ. प्रश्नांची उत्तरे या अनौपचारिक गप्पांमधून समोर आली.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या स्व ची कशी व केव्हा ओळख झाली ह्या विषयी बोलतांना डॉ नाडकर्णी यांनी ‘ज्यावेळी आजारावर लक्ष केंद्रित न करता आरोग्यावर लक्ष केंद्रित करायला हवे हे उमगले’ तो विचार या क्षेत्रात काम करण्यासाठीचा ‘connect’ होता हे सांगितले. ‘किल्लारीचा भूकंप व त्यात केलेले काम’ हे मला लोकाभिमुख मानसिक आरोग्याच्या उपचार पद्धतीकडे खेचून घेणारे ठरले असे डॉ. हरीश शेट्टी म्हणाले. डॉ. भरत वाटवानी यांनी डॉक्टरी शिक्षण घेत असतांना, खूप लोक वाईट परिस्थितीत असतात, त्यांना माझ्या मदतीची गरज आहे हे लक्षात आले. हा विचार मला या क्षेत्राशी जोडणारा होता असे सांगितले.

डॉ वाटवानींनी आपल्या कामाची सुरवात एका रस्त्यावरच्या मानसिक आजारी तरुणाला आपल्या छोट्या उपचार केंद्रात आणून केली. बऱ्या झालेल्या तरुणाला घरी पोचवल्यावर मिळालेले समाधान त्यांना पुरस्कारापेक्षाही खूप मोठे होते. डॉ. शेट्टी व डॉ. नाडकर्णी यांनी आपापल्या पद्धतीने मानसिक आजारासंबंधी समाजाभिमुख काम केले. ते काम करतांना अनेक वेगवेगळे मार्गांचा वापर(मुलांसाठी, पालकांसाठी, आजारी व्यक्तींसाठी, कॉर्पोरेट क्षेत्रासाठी, खेळाडूंसाठी) डॉ. नाडकर्णी यांनी केला.

या तिघांसाठी हे काम करणे सोपे नव्हते. त्यांना आर्थिक, सामाजिक विरोध, गुंडप्रवृत्ती अशी अनेक आव्हाने उभी राहिली. पण त्यांच्यातल्या या क्षेत्रात काम करण्याच्या ‘झपाटले’पणामुळे ते त्यातूनही उभे राहिले. हा सर्व प्रवास त्यांना त्या त्या टप्प्यावरचे समाधान देणारा होता. ‘डॉक्टरला पैशापेक्षा माणुसकी महत्वाची असायला हवी’, ‘प्रश्न येतीलच पण कोणत्याही परिस्थितीत पर्याय उभे करून पुढे जाणे महत्वाचे’ अशा घरातल्या शिकवणुकीने त्यांना काम करण्याचे पाठबळ मिळाले.

समाजाने मानसिक आरोग्याशी जोडून घेण्यासाठी, आपण सर्वांनी ‘आपण सगळे एकाच दिशेने ध्येयाकडे प्रवास करत आहोत’ हे लक्षात ठेऊया, स्वतःपलिकडे पाहूया, व आपल्या भावना मनात किंतु न ठेवता दुसऱ्यापर्यंत पोहोचवूया अशी अपेक्षा व्यक्त करून या अनौपचारिक गप्पांचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.