Pune News : कथकने जगण्याचा उद्देश तर दिलाच शिवाय जगण्याला अर्थ आणि सौंदर्यही दिले- शमा भाटे

एमपीसी न्यूज : एक कलाकार म्हणून कथकने मला जगण्याचा उद्देश तर दिलाच शिवाय, जगण्याला अर्थ आणि सौंदर्यही दिले, अशा शब्दांत कथक गुरू शमा भाटे यांनी आपले आणि कथकचे नाते उलगडले. कथक गुरू शमा भाटे यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला, (Pune News) याचेच औचित्य साधत पुण्यातील नृत्यांगनांनी एकत्र येत शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार केला. याला उत्तर देताना शमा भाटे बोलत होत्या. मयूर कॉलनी येथील एम ई एस सभागृह या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला.

यावेळी कथक गुरू डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांचा देखील सत्कार करण्यात आला. भरतनाट्यम गुरू डॉ. सुचेता भिडे चापेकर, गुरू डॉ. स्वाती दैठणकर, कथक नृत्यांगना मनीषा साठे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या अरुंधती पटवर्धन, रसिका गुमास्ते, लीना केतकर, प्राजक्ता अत्रे, मंजिरी कारुळकर आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे शहराने मला ओळख दिली, मान्य केलं ही बाब माझ्यासाठी सर्वात मोठी आहे असे सांगत शमा भाटे म्हणाल्या की, पुरस्कार उर्जा, स्फूर्ती, प्रेरणा देतो याबरोबरच बांधिलकी आणि दायित्व देखील देतो असं माझ्या गुरु रोहिणीताई सांगायच्या आज हा सत्कार स्वीकारताना याच भावना माझ्या मनात आहेत.

पुण्यात नृत्याचे धडे देणारे अनेक जण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्यरत आहेत असे सांगत पुण्याला नृत्याच्या क्षेत्रात देश विदेशात नेण्यासाठी पुण्यातील सर्व नृत्यांगनांनी शास्त्रीय नृत्य संवर्धन (Pune News) संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत काम करण्याची गरज असल्याचे शमा भाटे यांनी आवर्जून नमूद केले.

PCMC : शहर अस्वच्छ करणा-यांवरील दंडाच्या रकमेत दुपटीपेक्षा जादा वाढ, ‘इतकी’ असेल दंडाची रक्कम

लखनऊ घराण्याच्या शैलीचा प्रचार, प्रसार तू महाराष्ट्रात कर या पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांच्या आदेशाचे पालन करीत गेली 45 वर्षे मी कार्यरत आहे. आज कलाकारांच्या वतीने कलाकारांचा होणारा सन्मान आमच्यासाठी मोठा आहे असे डॉ, कपोते यांनी नमूद केले.

शमा भाटे आणि माझा परिचय हा तब्बल 4 दशके जुना असून पुरोगामी आणि जुन्याचा संगम त्यांच्या नृत्यातून आम्ही सर्वांनीच कायम अनुभविला असे सांगत डॉ. सुचेता भिडे चापेकर म्हणाल्या, “विचारमंथनाद्वारे आलेले नृत्य, गायन, वादन, प्रकाशयोजना यांचे महत्त्व शमाताईनी आपल्या सांघिक संरचनांमधून कायमच दाखवून दिले आणि हेच त्यांचे वेगळेपण आहे.”

आजवरच्या आपल्या संपूर्ण नृत्यप्रवासात शमा ताई यांनी आपल्यातली उर्मी फक्त जपली नाही तर संयम, सातत्य यांद्वारे सिद्धही केली असे मनीषा साठे यांनी सांगितले.(Pune News) यावेळी नृत्यांगना अरुणा केळकर, स्मिता महाजन यांनी शमाताई बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तर नादरूपच्या विद्यार्थिनींच्या नृत्य प्रस्तुतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. गौरी स्वकुळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.