Pune-Lonavala Local Train : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे विभाग घेणार आढावा

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत काही काळ (Pune-Lonavala Local Train)  लोकल सेवा बंद असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने दुपारच्या वेळेत पुणे आणि लोणावळा या दोन्ही स्थानकांवरून किमान एक लोकल सोडण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार वंदना चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर आता पुणे रेल्वे विभागाकडून दुपारच्या वेळेत तांत्रिकदृष्ट्या लोकल सुरु करणे शक्य आहे का, याचा आढावा घेतला जाणार आहे.

पुणे येथे रेल्वेची विभागीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीसाठी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार रणजीतसिंग निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर महाराज, खासदार धैर्यशील माने, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार वंदना चव्हाण, महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, उप महाव्यवस्थापक अजय मिश्रा, वरिष्ठ मुख्य परिवहन व्यवस्थापक श्याम सुंदर गुप्ता, वरिष्ठ मुख्य सुरक्षा आयुक्त अजोया सदानी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानासपुरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत पुणे-लोणावळा दरम्यान आणखी एक फेरी वाढविण्याची खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार वंदना चव्हाण (Pune-Lonavala Local Train)  यांनी रेल्वे विभागाकडे मागणी केली. पुणे रेल्वे स्थानकावरून 11.17 वाजता सकाळच्या सत्रातील शेवटची लोकल (01564) सुटते. त्यानंतर दुपारी 03.00 वाजता लोकल (01566) आहे.

तर लोणावळा स्थानकावरून सकाळी 10.05 वाजता सकाळच्या सत्रातील शेवटची लोकल (01559) सुटते. त्यानंतर सुमारे पावणे पाच तास एकही लोकल नाही. दुपारी 02.50 वाजता नंतरची लोकल (01561) सुटते.

Bhosari : बँक मॅनेजरला ब्लॅकमेल करत खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

हजारो नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी लोकलने प्रवास करतात. या मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील भरपूर आहे. मावळ परिसरातील नागरिकांना पुणे शहराला जोडणारी लोकलसारखी प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. बसने पुणे शहरात जाण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने नागरिक ‘वाट पाहीन पण लोकलने जाईन’ अशी भूमिका घेतात.

लोणावळा स्थानकावरून तब्बल पावणे पाच तास लोकल नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी रेल्वे स्थानकावर बसतात. इथे अपघात तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.

त्यात बराच वेळ रेल्वे स्थानकावर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे मधल्या कालावधीत लोकल सुरु करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निरीक्षण खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडले. मधल्या काळात मेंटेनन्सची कामे केली जात असल्याचे रेल्वेकडून सांगितले जाते. मात्र ही कामे इतर वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे खासदार बारणे म्हणाले.

पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे म्हणाले, “नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत खासदार यांनी दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याचा मुद्दा मांडला आहे. त्याबाबत रेल्वेकडून आढावा घेण्याचे काम सुरु आहे. पुणे विभागाकडून याबाबतचा आढावा घेऊन तसा अहवाल मध्य रेल्वेकडे पाठवला जाणार आहे.

मधल्या काळात लोकल सुरु करणे शक्य आहे का, याबाबतचा अहवाल मध्य रेल्वेकडून रेल्वे विभागाला सादर केला जाईल. लोकल सुरु करण्याचा अंतिम निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेतला जातो. दरम्यान, करोना काळात अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.

त्यात रेल्वेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दररोज किमान तीन तास ब्लॉक आवश्यक (Pune-Lonavala Local Train)  असल्याचेही डॉ. भिसे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.