Pune News : पुणे-लोणावळा लोकलसेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – गेल्या कित्येक महिन्यांपासून लोकल रेल्वे सेवा बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी राज्य शासनाला निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी हे निवेदन स्वीकारले. त्यावेळी युवा कार्यकर्ते संकेत खळदे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेल द्वारे हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातील लोकल सेवा बंद आहे. शहरातील परिवहन सेवा कोरोनाच्या काळात बंद होती. कोरोना साथ नियंत्रणात आल्यानंतर ती सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात रोज तळेगाव, वडगाव मावळ परिसरातून तसेच शेजारी असलेले पिंपरी चिंचवड शहरातून लाखो नागरिक नोकरी, व्यवसाय तसेच इतर छोटया मोठया उद्योगासाठी पुण्यात लोकलने ये जा करतात. त्यांच्या खिशाला परवडणारे एकमेव प्रवासाचे साधन म्हणजे लोकल होय. ती बंद असल्यामुळे लाखो लोकांचे प्रवासाचे अतोनात हाल होताहेत.

पुणे शहरासाठी तळेगाव, वडगाव मावळ येथून थेट बससेवा उपलब्ध नाहीत. पिंपरी चिंचवड येथून बस सेवा उपलब्ध आहेत. मात्र ही सेवा नागरिकांसाठी महाग आहे. कोरोना काळात तुटपुंजा पगार हातात येत असेल आणि महिन्याला हजारो रुपये प्रवासावर खर्च झाले, तर मग खायचे काय? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

बसेस मागील चार महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने धावतात. पण त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आलेले नाही. मग असे असताना, रेल्वे किंवा लोकलमध्ये कोरोना होतो का? हे काय रसायन आहे? असा सवाल करत पुणे लोणावळा लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.