Chinchwad News : लष्कर प्रमुखांच्या बंदोबस्तावेळी पोलीस चक्क मोबाईल कॉल आणि चॅटिंगमध्ये व्यस्त

लष्करी अधिकाऱ्यांच्या नाराजी नंतर महत्वाच्या बंदोबस्तावेळी पोलिसांना मोबाईल वापरण्यास बंदी

एमपीसी न्यूज – लष्कर प्रमुखाच्या भेटीच्या दरम्यान बंदोबस्तावर असलेले पोलीस मोबाईलवर कॉल, चॅटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. यामुळे लष्करी अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. त्यांनतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यापुढील काळात ज्यांना परवानगी असेल त्यांनीच मोबाइलचा वापर करावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शुक्रवारी लष्कर प्रमुख पिंपरी चिंचवडच्या हद्दीतून जाणार होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताच्यावेळी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोबाइलवर बोलण्यात आणि चॅटींग करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याने पोलिसांचे बंदोबस्ताकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळले.

पोलिासांच्या या कृत्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली. हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचले आणि आयुक्तांनी ‘यापुढील काळात कोणत्याही महत्वाच्या बंदोबस्ताच्यावेळी ज्यांना मोबाइल वापरण्याची परवानगी दिली असेल त्यांनीच त्याचा वापर करावा. जर बंदोबस्ताच्या ठिकाणी मोबाइलवर बोलताना किंवा विनापरवाना वापर करताना आढळून आल्यास सदर बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच याबाबतचा कसुरी अहवाल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, असा आदेश काढला.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या या आदेशामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.