Pune : गर्भवती महिलेसह छत्तीसगडकडे पायी निघालेल्या 63 मजुरांसाठी महापौरांकडून बसची व्यवस्था

विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून मदत

एमपीसी न्यूज – गरोदर महिला आणि लहान मुला-मुलींसह हिंजवडी भागातून छत्तीसगडकडे चालत निघालेल्या 63 मजुरांना दोन खासगी बसने छत्तीसगडकडे रवाना करण्यात आले आहे. येरवडा पोलीस स्टेशन येथून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून ही सोय करण्यात आली.

या वेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल भंडारे, संतोष राजगुरू, धनंजय जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक युनूस शेख, दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.

हिंजवडी भागातून गरोदर महिला, लहान मुलांसह मजूर चालत निघाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना छत्तीसगडवरून मिळाली. त्यानंतर तातडीने मदत करण्यासंदर्भात फडणवीस यांनी महापौर मोहोळ यांना फोन करून कल्पना दिली.

त्याची तत्काळ दखल घेत महापौर मोहोळ यांनी मजुरांशी संपर्क साधला असता. सर्व मजूर येरवड्यापर्यंत पायी पोहोचले होते. त्यावेळी मोहोळ यांनी आहे त्याच ठिकाणी थांबण्याची विनंती करत, मजुरांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय येरवड्यात केली.

महापौर मोहोळ यांनी अवघ्या 24  तासात छत्तीसगडच्या प्रवासाची तांत्रिक परवानगी उपलब्ध करून घेत, त्यांची वैद्यकीय तपासणी करून सर्व मजुरांना सोमवारी दुपारी बारा वाजता दोन खासगी बसच्या माध्यमातून येरवडा पोलीस स्टेशनपासून छत्तीसगडला रवाना केले.

महापौर म्हणाले, ‘मजुरांशी संपर्क केल्यावर त्यांना येरवड्यातच थांबण्याची व्यवस्था करुन त्यांच्या जाण्याचे नियोजन केले. पायी जाण्याची मानसिकता केलेल्या मजुरांना बसची व्यवस्था केल्याचे समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान मलाही आनंद देऊन गेले’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.