Pune : पुण्यातील ‘ते’ कुटूंब सुखरुप !; मोबाईल रेंज नसल्यामुळे होते ‘औट ऑफ रेंज’ !

एमपीसी न्यूज- मोबाइलला रेंज नसली की इतरांचा केवढा मोठा गैरसमज होऊ शकतो याचा प्रत्यय आज पुण्यात आला. हडपसरमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबातील सातजण बेपत्ता आहेत या बातमीने खळबळ उडाली होती. परंतु, बेपत्ता असलेल्या सातजणांचा शोध लागला असून मोबाइलला रेंज नसल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी आणि पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला.

पुण्याच्या हडपसर परिसरात राहणारे सिध्दार्थ उर्फ हरीष सदाशिव मगर (वय 38), सौ स्नेहल उर्फ ईश्वरी हरीश मगर, त्यांच्या पाच वर्षाच्या जुळ्या मुली – आरंभी आणि सायली, जगन्नाथ हरी सातव, त्यांची पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असे हे पाच जण पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

मंगळवारी त्यांनी खडकवासला येथील अक्वेरीयस हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. स्नेहल मगर यांनी त्याच दिवशी सकाळी आपल्या बहिणीला फोन करुन फिरण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर दुस-या दिवशी हे कुटूंबिय पानशेत परिसरातील गुंजन रिसॉर्ट येथे राहण्यास गेले. त्याठिकाणी मोबाईलला रेंज नसल्यामुळे त्यांचा कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही.

त्यामुळे बुधवार सकाळपासून त्या सर्वांचे फोन संपर्क क्षेत्रात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील त्वरित पावले उचलत तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली. सात जण एकाचवेळी बेपत्ता झाल्याच्या घटनेने पोलीसही हादरले.

परंतु, आज सकाळी पुण्याच्या दिशेने परत येताना या कुटुंबाने आपल्या नातेवाईकांना फोन करून आम्ही येत असल्याचे सांगितले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. केवळ रेंज नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असल्याचे हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.