Pune : उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला, पाटबंधारे विभाग आपल्या मतावर ठाम

एमपीसी न्यूज – “उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालव्याचा भराव खचून तो फुटला,’ असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर दिले आहे. त्यामुळे कालवा कसा फुटला, यावर गदारोळ होऊनही जलसंपदा विभाग अजूनही उंदीर, घुशीं, खेकड्यांमुळेच तो फुटला यावर ठाम आहे.

मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लेखी प्रश्‍न विचारला होता. त्यामध्ये कालवा बाधितांशी संबंधित तसेच कालवा दुरुस्ती आणि अन्य विषयांबाबत प्रश्‍न विचारले होते. त्याला उत्तर देताना “कालवा कशामुळे फुटला ?’ याचे लेखी उत्तरही जलसंपदा विभागाने दिले आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या एकूण 202 कि. मी. लांबी पैकी 30 किमी कालवा पुणे शहराच्या मध्यभागातून आणि दाट लोकवस्तीतून जातो. 26 सप्टेबर रोजी कालवा विसर्ग 1,277 क्‍युसेक होता. 27 सप्टेंबरला सकाळी 11 ते 11.15 च्या दरम्यान कालव्याच काही भाग फुटला. कालव्याच्या तळातून म्हणजे भरावाच्या खालून फाउंडेशनला पाईपिंग झाल्यामुळे म्हणजेच बिळे पडल्यामुळे या ठिकाणचा भराव खचून हा कालवा फुटल्याचे उत्तरात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.