Pune : वर्दीच्या आतला ‘माणूस’ व्यक्त व्हायला हवा-नागराज मंजुळे

एमपीसी न्यूज – पोलिसांबाबत आस्था वाटणारे अधिकारी आपल्यात आहेत. त्यांच्या व्यथा समजण्यासाठी असे साहित्य निर्माण व्हायला हवे. वर्दीतल्या कठोर पोलीसांमागे भावनाशील माणूस दडलेला असतो. तो माणूस या ‘पोलीस फाईल्स’मधून व्यक्त झाल्याचे दिसत आहे. या तपासकथा वाचताना विषयांचे वैविध्य त्यांना आलेले अनुभव यात आले आहे. पोलिसांचे जगणे, त्यांच्या भावनिक कथा याव्यात. त्यासाठी लवकरच एका लघुपटातून पोलिसांचे जीवन उलगडणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित आणि पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम संकल्पित ‘पोलीस फाईल्स’ पुणे पोलिसांच्या तपासकथा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. बाणेर रस्त्यावरील यशदामध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर होत्या. डॉ. के. व्यंकटेशम, अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार अगरवाल, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, पुस्तकाच्या समन्वयिका विदुला टोकेकर आदी उपस्थित होते.

नागराज मंजुळे म्हणाले, “पोलीस अकार्यक्षम असल्याचे बोलले जाते. मात्र, आपण समाज म्हणून आपल्या जबाबदारी पाळतो का ? याचा विचार केला पाहिजे. पोलीस रात्रंदिवस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या अंगाने गुन्हा उलगडण्यासाठी काम करतात. त्यांचे अनुभव अशा स्वरूपात यावेत, हे त्यांच्या कार्याची दखल आहे. त्यांच्यात दडलेला कवी, लेखक, कलाकार जागा झाला पाहिजे.”

अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, “या पोलीस कथांमधून इतर पोलीस अधिकारी लिहिते होतील. पोलिसांसंबधीत संशोधनात आपण योगदान द्यावे. त्यासाठी विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करत आहोत.” संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. विदुला टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र शिसवे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.