New Delhi : विधानसभेचे बिगुल वाजले ! 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला निकाल

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. महाराष्ट्रात 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दिवाळीपूर्वी 24 ऑक्टोबरला निकालाचे फटाके वाजणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोणते सरकार सत्तेवर येणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दरम्यान निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

सत्ताधारी भाजप शिवसेना युतीने या अगोदरच प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यापासून महाजनादेश यात्रा काढून राज्यभरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. या महाजानदेश यात्रेचा समारोप नुकताच नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सध्या शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून वाटाघाटी सुरु आहेत. मात्र युती होणार की नाही या बद्दलही संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीमध्येही आघाडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. आता निकालानंतर राज्यात सत्ताबदल होणार की पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार सत्तेवर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोग पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

# उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत – 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

# अर्जाची छाननी – 5 ऑक्टोबर

# उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख – 7 ऑक्टोबर

# मतदान – 21 ऑक्टोबर

# निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर

# आजपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू

# राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्यात निवडणूक

# राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.