Talegaon Dabhade : मावळसाठी आघाडीकडून तळेगावचा उमेदवार नको ; चंद्रकांत सातकर यांची मागणी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसाठी तळेगाव सोडून अन्य ठिकाणचा उमेदवार दिल्यास आघाडीच्या हिताचे ठरेल अशी मागणी मावळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी (दि. 20) चंद्रकांत सत्कार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माहिती देताना सातकर म्हणाले की, सर्वपक्षीय भेगडे मंडळीना कुठल्याही पक्षाचा उमेदवार हा फक्त भेगडेच पाहिजे असे वाटते. त्यांनी कधीही सातकर, ढमाले, दाभाडे, नेवाळे, पाळेकर, हुलावळे, खळदे, काकडे, खांडगे, यांना राजकीय पाठबळ दिले नाही व देणार नाहीत. हे लोक निवडणूक काळात नात्यागोत्यातील राजकारण पुढे आणून त्या लोकांच्या नावांच्या याद्या काढतात व निवडणुकीपुरता नात्यातील लोकांचा फक्त वापर करतात, असा आरोप सातकर यांनी केला.

मावळ तालुक्यातील सर्व पक्षाने तळेगावलाच नेतृत्व बहाल केले आहे का ? असा सवाल करीत सातकर म्हणाले की, मावळ तालुक्यातील राजकारण दहशत आणि पैशाच्या जोरावर दिशाहीन झाले असून तळेगावने कधीही आघाडीच्या उमेदवाराला लिड दिला नाही. यापुढे मावळ तालुक्यामधील दहशतीचे वारे थांबवायचे असेल तर चांगल्या लोकांनी एकत्र येऊन दिशाहीन झालेला मावळ तालुका चांगल्या माणसाच्या मागे उभा करण्याची गरज आहे. तरच मावळ तालुक्यात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते पुढे येतील. ग्रामीण भागात सर्व राजकीय पक्षामध्ये सक्षम कार्यकर्ते आहेत. त्यांनी तालुक्यातील महत्वाची पदे सांभाळली आहेत. तरीसुद्धा उमेदवारी देताना ग्रामीण भागाला पक्षाकडून दुजाभाव दिला जातो.

ग्रामीण भागाला आमदाराची प्रचंड गरज असते. कारण नगरपालिकेला बजेट असते व करवसुलीही होत असते. आणि विकासासाठी शासनही मोठया प्रमाणात निधी देत असते. त्यामुळे पालिकेच्या कार्यक्षेत्राचा विकास होत असतो. मात्र ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतीला घराचा टॅक्स वेळेत मिळत नसतो व शासनाचीही भरीव अशी तरतूद नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी ग्रामीण कार्यकर्त्यांना विकासासाठी आमदाराकडे काम घेऊन जावे लागते. आमदार शहरातील असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीचे काहीही कळत नसते. त्यामुळे असे लोक आमदार होतात तेव्हा ग्रामीण भागातील विकासाचे व गरीब माणसाचे फार मोठे नुकसान होते.

त्यामुळेच आघाडीने मावळ विधानसभेसाठी तळेगावच्या उमेदवारी ना देता ग्रामीण भागातील सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी विनंती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याचे सातकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मावळ तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, अॅड खंडूजी तिकोणे, यादवेंद्र खळदे, चंद्रभान खळदे, पै संभाजी राक्षे, विजय काशिद, देवीदास जाधव, आस्लम शेख, संभाजी लेंडघर, शांताराम नरवडे, वैष्णवी झगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.