Vadgaon : मी भाजपमध्येच आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – रुपलेखा ढोरे

एमपीसी न्यूज – मी गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक काम करीत आहे. मी भाजपमध्ये आणि पुढेही भाजपमध्येच राहणार आहे, असे स्पष्टीकरण माजी आमदार रुपलेखा ढोरे यांनी केले आहे. मावळच्या जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीच्या वतीने राज्यमंत्री बाळा भेगडे निवडणूक ल़ढवत आहेत. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या सुनील शेळके यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मावळमधील लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशा आशयाची पोस्ट आज (रविवार) दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. रुपलेखा ढोरे यांनी संध्याकाळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून अफवेचे खंडन केले.

मतदानाच्या आदल्या दिवशी अशा प्रकारच्या अफवा पसरवून आपली बदनामी करणाऱ्यांविरुद्ध आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे, असे ढोरे यांनी म्हटले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांनाच विजयी करून मतदारांनी मावळच्या विकासाची गती कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.