Pune News : पालघर, रायगड, पुण्यात रुग्णांवर ‘रेमडेसिविर’चा दुष्परिणाम

एमपीसी न्यूज – हेटेरो हेल्थकेअर कंपनीच्या रेमडेसिविर औषधाचे पालघरमध्ये वितरण झाले होते. तांत्रिक कारणामुळे या औषधाचा वापर करू नका, अशी सूचना कंपनीने केली होती. मात्र रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांनी हे औषध तातडीने रुग्णांना दिले. त्यात 232 रुग्णांपैकी 13 जणांना अंग थरथरण्याचा त्रास काही काळ जाणवला. रायगडमधील 90 जणांना त्रास झाला, तर पुण्यातही काही विभागांतून या औषधामुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पालघरमध्ये बुधवारी पुरवठा केलेल्या रेमडेसिविरच्या 650 कुप्यांचा वापर न करण्याचे कंपनीने जाहीर केले होते. पण हा आदेश मिळण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी 232 रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर केला. त्यामुळे 13 रुग्णांना त्रास झाला.

शरीराला कंप सुटत असल्याचे या रुग्णांनी सांगितले. रायगडमध्ये रेमडेसिविरच्या 500 कुप्या देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 120 कुप्या रुग्णांना देण्यात आल्या. यातील 90 जणांना इंजेक्शन घेतल्यावर त्रास जाणवला. तर पुण्यात दोन हजार 155 कुप्या वितरित झाल्या होत्या. त्यातील काही कुप्या रुग्णांसाठी वापरण्यात आल्यानंतर त्यांना त्रास झाला.

रायगड जिल्ह्यात ‘हेटेरो हेल्थ केअर’ कंपनीकडून वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. तर या इंजेक्शन्सचा पुरवठा पुणे शहरासह जिल्ह्यात तूर्त थांबवण्यात आला असून या तक्रारीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कंपनीकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.