Pune News : कस्टमच्या मालाची विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतवलेले 30 लाख परत मागितल्याने मित्राचा खून करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कस्टमचा माल आणून त्याची विक्री करुन व्यवसाय करण्यासाठी गुंतविलेल्या 30 लाख रुपयांचा मोबदला न दिल्याने तरुणाने पैसे परत मागितले. त्यावरुन मित्रानेच मित्राच्या गळ्यावर चाकूने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकिस आली आहे. शनिवारी (दि. 07) हडपसरमधील रवी दर्शन सिग्नल ते एम. कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

सचिन दिलीप होले (वय 34, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शादाब शेख (वय 36, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. होले याने शेख व त्यांच्या मित्रांना आपण जेएनपीटी येथून कस्टमचा माल घेऊन त्यांची विक्री करु. जो काही नफा होईल ते सगळे मिळून वाटून घेऊ, असे सांगितले. त्याने शेख व त्यांच्या मित्रांकडून 29 लाख 90 हजार रुपये घेतले. मात्र, त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही.

शेख यांनी होले याच्याकडे त्यांनी गुंतविलेले पैसे परत मागितले. तेव्हा होले याने त्यांना मेसेज करुन सय्यदनगर रेल्वेगेटजवळ शनिवारी सकाळी बोलविले. त्यानुसार शेख हे तेथे सकाळी पावणेअकरा वाजता गेले. तेथून त्यांना रवीदर्शन येथे नेऊन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.