Pune News: …तोपर्यंत बार बंदच ठेवणार, पुण्यातील बारचालकांचा निर्णय

एमपीसी न्यूज – कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले. रेस्टॉरंट अँड बिअर बार सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु काही रेस्टॉरंट चालकांना अद्याप कोणतीही लेखी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे पुण्यातील काही बियरबार चालकांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. शासनाकडून लेखी आदेश मिळणार नाही, तोपर्यंत बियरबार सुरू न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

उद्यापासून अनलॉकची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. या टप्प्यात राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 50% ग्राहकांना प्रवेश देण्याच्या अटीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. परंतु सध्या फक्त सरकारने तोंडी आदेश दिले आहे.

लिखित परवानगी नसल्यामुळे रेस्टॉरंट किंवा बार सुरू केले तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होऊ शकते. त्यामुळे परवानगी देण्याची मागणी या बियर बार मालकांनी केली.

बिअर बारचे मालक असलेले सदानंद शेट्टी म्हणाले,  लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे या काळात कुठलेही उत्पन्न मिळाले नाही. त्यातच हॉटेल कामगार ही आपापल्या गावी गेल्याने आणि रेस्टॉरंट सुरू करायचे तरी कसे असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.

त्यामुळे जोपर्यंत आम्हाला शासनाकडून लेखी परवानगी मिळत नाही तोपर्यंत बियरबार सुरू करणार नसल्याचे त्यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.