Pune News ; भाजपा आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे ‘भामा आसखेड’च्या कार्यक्रमाला गालबोट !

एमपीसी न्यूज : भामा आसखेड योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आज गोंधळ पहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या घोषणाबाजीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले. या सर्व प्रकारामुळे भामा आसखेड योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लागले.

पुणे महापालिकेच्या‌ सभागृहात दोन्ही नेत्यांच्या‌ उपस्थितीमध्ये‌ भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्येही श्रेयवादाचे पडसाद उमटले. महापालिका भवनाच्या परिसरात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली.

त्यानंतर नेत्यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत राडा घातला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते.

देवेंद्र फडणवीस सभागृहात येऊन स्थानापन्न झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पायऱ्या चढत सभागृहात पोहोचले. याची चाहुल लागताच सभागृहाच्या‌ प्रवेशद्वाराजवळ भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट, मोदी मोदी, देवेंद्र फडणवीस‌ तुम आगे बढो ‘, अशा घोषणा देण्यास‌ सुरूवात केली.

त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील ‘एकच वादा, अजित दादा’ अशा घोषणा दिल्या. यावेळी अजित पवार यांनी घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झापले. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. या घोषणाबाजीतच अजित पवार यांनी सभागृहात प्रवेश केला.

अजित पवार सभागृहात गेल्यानंतर मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध भडकले. दोन्ही ग्रुप घोषणाबाजी‌ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. सभागृहात लोकार्पण सभारंभ रंगलेला असताना, बाहेर मात्र घोषणाजीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बंदोबस्तावरील पोलिस आणि पालिकेचे सुरक्षा कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.