Pune News : छोट्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने काँग्रेसचा कृषी विधेयकांना विरोध : रावसाहेब दानवे

एमपीसी न्यूज – मोदी सरकारच्या कृषी विधेयकांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केले.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर, खासदार भागवत कराड, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे,उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी मंत्री दिलीप कांबळे, बाळा भेगडे, गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते.

रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘ शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक या तीन विधेयकांवरून काही विरोधी पक्षांनी काहूर उठविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी या विधेयकाच्या प्रती फाडल्या, काहींनी काळा कायदा असे या विधेयकाचे वर्णन केले.

आपल्याच पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात अशा पद्धतीच्या सुधारणा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. या तीन विधेयकांमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे जाणून न घेताच या विधेयकांना आंधळा विरोध सुरु आहे.’

1955  चा अत्यावश्यक वस्तू कायदा मोदी सरकारने रद्द केला. या कायद्यानुसार शेतमाल साठवणुकीत खासगी गुंतवणुकीस मर्यादा घालण्यात आली. व्यापारी, धान्य – फळांवर प्रक्रिया करणारे, अन्न -धान्य, फळांची निर्यात करणारे व्यापारी यांना साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आल्या. परिणामी शेतमाल साठवणुकीची व्यवस्था ही फक्त सरकारी यंत्रणेच्या ताब्यातच राहिली.

भाजीपाला, धान्य, फळे हंगामात एकाच वेळी बाजार समित्यांमध्ये येऊ लागल्याने भाव आपॊआपच कोसळू लागतात. जर साठवणुकीच्या व्यवस्था मोठ्या प्रमाणात असत्या तर शेतकऱ्यांनी हंगामात एकाच वेळी माल आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणला असता. तसे झाले असते तर बाजारात भाव वारंवार कोसळले नसते, असे दानवे यांनी सांगितले.

आता या कायद्याने शेतमाल साठवणुकीमध्ये ( स्टोअरेज ) मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूक होऊ शकेल. शेतकरी आपला माल स्टोअरेजमध्ये ठेवतील व बाजारातील मालाची उपलब्धता पाहून आपला भाजीपाला, फळे, धान्य बाजारात आणू शकतील. या तीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आपला माल राज्याबाहेर विकता येणार आहे.

मोदी सरकारने प्रत्येक गावात गोदाम बांधण्याची योजना जाहीर केली आहे. शेतकरी गरजेवेळी नाशवंत शेतीमालाची मिळेल त्या किमतीत विक्री करतो.

आता गोदामांसारखी साठवणुकीची व्यवस्था आकारास येईल. परिणामी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे, धान्य, तेलबिया यांची साठवणूक करून त्याची विक्री बाजारातील तेजी मंदी पाहून करता येणे शक्य होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.