Pune News : केवळ 18 दिवसांत उभारलेल्या सीओईपी येथील जम्बो कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ऑनलाइन उदघाटन

एमपीसी न्यूज -पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथे निर्माण करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचे आज (रविवारी) लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन केले.

रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पीएमआरडीएचे सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए)  सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांत बांधून पूर्ण केले आहे. पुण्‍यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.