Pune News : विद्यापीठ परीक्षेच्या हॉल तिकीटवर मिळाले वेगळेच विषय; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा दोन दिवसात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या रिसीट ऑनलाईन उपलब्ध झाल्या असून त्यामध्ये अनोखा गोंधळ समोर आला आहे. ज्या विषयाचा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला आहे, ज्या शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ते विषय रिसीटवर आले नसून वेगळेच विषय आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नॅशनल अँटी क्राईम अँड ह्यूमन राईट काउंसिल ऑफ इंडियाच्या ज्ञानेश्वरी शेठ यांनी ‘एमपीसी न्यूज’ला याबाबत माहिती दिली. गुरुवार (दि. 24) पासून पुणे विद्यापीठाची विविध शाखांची परीक्षा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांची ज्या विषयांची परीक्षा आहे, त्या विषयांचे कोड आणि विषय विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर आलेले नाहीत. तर वेगळेच विषय आणि त्याचे कोड हॉल तिकीटवर आले आहेत.

विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरला होता. मात्र तरीही असा घोळ झाला आहे. विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. विद्यार्थी विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क करीत आहेत. मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. विद्यार्थ्यांनी हा प्रकार महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दिला आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून पुन्हा फॉर्म भरून घेतले आहेत. मात्र ते अजूनही विद्यापीठात जमा केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही अडचण सुटण्याचे नाव घेत नसल्याचेही शेठ म्हणाल्या.

विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बदलून नियोजित वेळेत परीक्षा घ्यावी. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करून त्यावरून योग्य परीसाद द्यावा. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्यामध्ये संभ्रम होणार नाही, असेही ज्ञानेश्वरी शेठ यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी श्रद्धा कोळेकर म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे तक्रार करावी. विद्यापीठाशी प्रत्यक्ष चर्चा करून मार्ग काढता येईल.”

पुणे विद्यापीठ परीक्षा विभागाचे संचालक महेश काकडे म्हणाले, “हॉल तिकीटमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास, त्याचे अर्ज आल्यास हॉल तिकीट दुरुस्त करून दिले जात आहेत. काही वेळेला विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरताना विषय निवडताना चुका करतात. मात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरले असतील आणि तरीही त्यांना अशी अडचण आली असेल तर त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा. महाविद्यालयाकडून फॉर्म योग्यरीत्या इनवर्ड झाला नाही तर त्यासाठी महाविद्यालय जबाबदार आहे. महाविद्यालयांनी तत्काळ असे फॉर्म विद्यापीठाकडे पाठवून दुरुस्ती करून घ्यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.