Pune News: आर्थिक संकटात सापडलेल्या PMPML ला शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी – महापौर मुरलीधर मोहोळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी पत्राद्वारे घातले साकडे

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमपीएमएलला शासनाने मदत करावी, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. यासंदर्भात महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. पीएमपीएमएल पूर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत होण्यासाठी भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती महापौर मोहोळ यांनी केली आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि परिसराची एकूण लोकसंख्या अंदाजे एक कोटी पर्यंत आहे. या परिसरातील साधारणतः 11 लाख लोक पीएमपीएमएलने प्रवास करतात. पीएमपीएमएल मार्फत जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, दलित मित्र पुरस्कार विजेते, अंध ब दिव्यांग नागरिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांसाठी बसपास सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, असे महापौर मोहोळ यांनी पत्रात म्हटले आहे.

या दोन्ही शहराबाहेर साधारणपणे 30 किमी पर्यंत ही बससेवा विस्तारलेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड हददीबाहेरील सासवड, चाकण, आंळदी, राजगुरुनगर आणि तळेगाव दाभाडे या पाच नगरपालिका आणि पुणे, खडकी, देहू रोड हे तीन कॅन्टोमेंट बोर्ड तसेच हद्‌दीबाहेरील 128 गावांमधील लोकांना अत्यंत माफक दराने ही बससेवा पुरविली जाते, अशी माहिती पत्रात देण्यात आली आहे.

एकूण 300 मार्गावर 1716 बसेस धावत आहेत. पीएमपीएमएलमार्फत 50 मोठी बस स्थानके, 2 यंत्र शाळा, 13 बस डेपो, 2 अद्ययावत ई-बस डेपो, अंध व दिव्यांग व्यक्‍तींकरिता 41 पास केंद्र चालविली जातात. पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकही या बससेवेचा अधिकाधिक लाभ घेतात, असे महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक कामगार, कष्टकरी वर्ग, महानगरपालिकेचे कर्मचारी, आरोग्य सेवक, कोविड योध्दे, खासगी रुग्णालयाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी इत्यादींच्या प्रवासाचे प्रमुख साधन पीएमपीएमएल आहे, याकडे महापौरांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

कोविड-19 च्या लॉकडाऊन कालावधीमध्ये पीएमपीएमएल बसेसची वाहतूक बंद होती. त्यानंतर पुढील काही महिने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सोय पीएमपोएमएल मार्फत करुन देण्यात आलेली होती. मात्र सद्यस्थितीस पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांतील दैनंदिन व्यवहार नित्यनियमाने चालू
झाल्याने या दोन्ही शहरांतील नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन पीएमपीएमएल सुविधेचा वापर करीत आहेत, अशी माहिती पत्रात देण्यात आली आहे.

कोविड-19 च्या या जागतिक महामारीच्या संकटामुळे पीएमपीएमएल आर्थिक संकटात सापडली आहे. पीएमपीएमएलचे पूर्ण क्षमतेने संचलन करणेकरिता राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करवी, अशी आमची मनीषा आहे. तरी या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आपल्यामार्फत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ला आर्थिक मदत मिळावी,  अशी विनंती महापौरांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.