Pune News : शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंजुरी 

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंजुरी देत त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्याचे निर्देश आज आढावा बैठकीत दिले.

तसेच डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटीला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले. प्रस्तावित मेडिसिटीमध्ये ट्रॉमा क्रिटीकल, कार्डिऑलॉजी, न्युरोलॉजी, डेंटल, नेफ्रोलॉजी, एन्डोस्कोपी, पेडिअ‍ॅट्रीक, ऑफथॅलमॉलॉजी, गॅस्ट्रोअ‍ॅन्ट्रॉलॉजी, एन्डोक्रायनॉलॉजी, हिमॅटॉलॉजी, गायनाकॉलॉजी, रेडिओलॉजी, ऑर्थोपेडीक, कॉस्मेटिक आणि बर्न सर्जरी, युरोलॉजी, पॅथॉलॉजी तसेच आयुष हॉस्पिटल इत्यादी सर्व विभागांसाठी स्वतंत्र 24 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे.

आरोग्यमंत्री टोपे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीला पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, डॉ. साधना तायडे, सहसचिव दिलीप गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून इंद्रायणी मेडिसिटीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आरोग्य यंत्रणा सुधारुन अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तसेच युवा वर्गाला रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.