Pune News : माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – पुण्याचे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील पाल गावातील पूरग्रस्तांना  धान्य व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

माजी आमदार निम्हण यांचा 5 ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. मात्र, तो अत्यंत साधेपणाने साजरा करून वाढदिवसानिमित्तचा कार्यक्रम न घेता सनी निम्हण व कार्यकर्त्यांनी पाल गावातील शंभर कुटुंबांना मदतीच्या साहित्याचे वाटप केले.

धान्य, रेशन कीट, कपडे, ब्लँकेट, औषधे तसेच विद्यार्थ्यांसाठी दप्तर, कंपास, वह्या, पुस्तके इत्यादी शालोपयोगी साहित्याचा समावेश आहे. पाल गावातील मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व कराड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील व स्थानिक देवस्थान सदस्यांच्या मदतीने सनी ऊर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या हस्ते पाल गावातील पूरग्रस्त बाधितांना ही मदत देण्यात आली.

याप्रसंगी सनी निम्हण म्हणाले की, 22 ते 24 जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाल गावातील नदीच्या दोन्ही बाजूंना असणार्‍या शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच गावकर्‍यांच्या घरात पाणी घुसल्यामुळे अतोनात हानी झाली. या पूरग्रस्त बाधित कुटुंबांना नव्याने संसार उभारण्यासाठी ही मदत देत आहोत.

माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून कार्यकर्त्यांनी या रकमेतून सामाजिक भान ठेवून पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार ही मदत देत आहोत. पूरग्रस्त बाधितांच्या हालअपेष्टा संपून त्यांचे जीवन पूर्ववत सुरू होवो, ही खंडोबाचरणी प्रार्थना करतो.

याप्रसंगी बोलताना देवराज पाटील म्हणाले की, अतिवृष्टीने पाल गावाचा फार मोठा भाग पाण्याखाली गेला, शेतकर्‍यांचेही नुकसान झाले. अशा संकटसमयी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर खर्च न करता सनी निम्हण व कार्यकर्त्यांनी सर्व रकमेतून पूरग्रस्त बाधितांना मदत करण्याचे ठरवले. याबद्दल सारे गावकरी कृतज्ञ आहेत. या मदतीमुळे गावकर्‍यांना मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी देवराज पाटील यांच्या समवेत पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक अमित गावडे, विष्णू काकडे, रोहित किरदत्त, मंगेश घोलप, हृषीकेश निम्हण, अविनाश गायकवाड व इतर पुण्याहून मदत वाटपासाठी आलेले सुमारे 30 कार्यकर्ते होते. पुण्याहून येऊन गावकर्‍यांना घरोघरी मदत पोच केल्याबद्दल अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.