Pune News: पुण्याचं पाणी कमी करण्याचा डाव; महापौरांचा पाटबंधारे विभागाला इशारा

एमपीसी न्यूज: पुणेकरांना गरजेचं असणारं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. उद्यापासून पुणे शहराचे पाणी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे, याचा समस्त पुणेकरांच्या वतीनं तीव्र निषेध! जलसंपदा विभागाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत, असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन १ हजार ४६० एमएलडी पाणी खडकवासलातून आणि ३८० एमएलडी पाणी भामाआसखेडमधून पुरवठा होतोय. परंतु उद्यापासून पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करत आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पालकमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माझी विनंती आहे, पुण्याचं पाणी कृपया कमी करु नका. पाणीगळती थांबवणे, पाणीबचत करणे, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत.
२४x७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरु असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चीड आणणारा आहे.

शेतीला पाणी देण्यास आम्हा पुणेकरांचा अजिबातही विरोध नाही. मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये? जलसंपदाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नसल्याचा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.