Pune News : पीएमपीच्या बसेस ओळखण्यासाठी करिस्मा उपक्रम; रंगावरून समजणार बसचा मार्ग

एमपीसी न्यूज : शहरातील विविध मार्गांवरील पीएमपी बसेस प्रवाशांना सहज ओळखता येण्यासाठी प्रत्येक मार्गाला विशिष्ट रंग निश्चित करण्यात आला आहे. येत्या काळात पीएमपीकडून ‘करिस्मा’ (कलर कोडिंग ऑल रूट्स टू आयडेंटिफाय सिम्प्लिीफाय मॅप्स अँड ऍप) हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने यामुळे रंगावरूनच बसचा मार्गाची माहिती प्रवाशांना समजणार आहे.

ही सेवा ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून मोबाइलवर देखील उपलब्ध होणार आहे. यामुळे मार्ग क्रमांक, थांबे याबाबतची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी 207 मार्गांसाठी 15 रंग निश्चित केले असून शुक्रवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत प्रवासी सेवा देण्यात येते. यासाठी प्रत्येक मार्गासाठी एक क्रमांक देखील असतो. याशिवाय पाट्यांवर मार्गाची माहिती सुद्धा असते. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे सोपे जाते.

याबरोबरीने येत्या काळात रंगांची भर पडणार असून क्रमांकाबरोबर आता ठराविक रंगांचे स्टीकर देखील लावण्यात येणार आहेत. येत्या काळात पीएमपीकडून ‘करिस्मा’ (कलर कोडिंग ऑल रूट्स टू आयडेंटिफाय सिम्प्लिीफाय मॅप्स अँड ऍप) हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने यामुळे रंगावरूनच बसचा मार्गाची माहिती प्रवाशांना समजणार आहे.

यामध्ये लाल, निळा, काळा, जांभळा, हिरवा, पारवा, गुलाबी, पोपटी, तपकिरी, पिवळा आदी रंगांचा समावेश आहे.

यापूर्वी ‘अटल’ बससेवेसाठी केशरी आणि विमानतळाहून धावणाऱ्या ‘अभी’ बससाठी गुलाबी रंग निश्चित केला आहे. यानंतर आता 207 मार्गांवरील बसेसना 15 रंगाचे स्टीकर लावण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 1300 बसेसना हे स्टीकर लावले आहेत.

यासह क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मार्गाची माहिती मिळणार आहे. तर, थांब्यावरील कोड स्कॅन केल्यानंतर त्या थांब्यावरून ये-जा करणाऱ्या बसेस, मार्ग क्रमांक, त्यांचे रंग आदीची माहिती मिळणार आहे.

लंडनमधील बससेवा धर्तीवर अंमलबजावणी…

लंडनमधील सार्वजनिक बसेसना विशिष्ट रंग निश्चित केले असून हा उपक्रम राबविण्यासाठी लंडन शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला आहे. याच धर्तीवर पुण्यात पीएमपीकडून ‘करिस्मा’ (कलर कोडिंग ऑल रूट्स टू आयडेंटिफाय सिम्प्लिीफाय मॅप्स अँड ऍप) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

प्राथमिक टप्प्यात 90 दिवस ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत असून, नागरिकांच्या अभिप्रायानंतर यात बदल करणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.