Pune News : हस्तांतरण शुल्क न भरणाऱ्या फेरीवाल्यांचा परवाना  होणार  रद्द; महापालिकेचा अतिक्रमण विभाग नियमानुसार करणार कारवाई

एमपीसी न्यूज –  शहरातील ज्या अधिकृत फेरीवाल्यांनी इतर फेरीवाल्यांकडून परवाना घेतला आहे, त्यांना हस्तांतरण शुल्क भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  हे शुल्क 1 लाख ते 2 लाखांपर्यंत आहे. मात्र हे शुल्क भरण्यास फेरीवाले उदासीन दिसतात.  त्यामुळे महापालिकेचे ही नुकसान होत आहे.  यामुळे आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कडक भूमिका घेतली आहे.  फेरीवाल्यांना हस्तांतरण शुल्क भरण्यासाठी विभागाने दोन वेळा मुदत दिली होती. तरीही काही लोकांनी शुल्क भरले नाही शिवाय संगणकीय नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले नाही. अशा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.

 हातगाडी, पथारी असे व्यवसाय करण्यासाठी पालिकेच्यावतीने स्टॉलचे परवाने वाटप करण्यात आले. 1989 मध्ये ही संख्या सुमारे 7792 होती. नंतर यापैकी बरेच परवानाधारक त्यांचे परवाने इतरांना वारसा हक्काने किंवा परस्पर हस्तांतरित करतात. ज्यांनी असे परवाने घेतले आहेत आणि सध्या ते स्वतः व्यवसाय करत आहेत, त्यांनी पालिकेच्या लागू हॉकर्स कायदा धोरणानुसार स्वतःच्या परवान्याची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  हा नियम सर्वसाधारण सभेने केला होता.  त्यामुळे आधी सेटलमेंट फी भरून स्वत:च्या नावावर परवाना घेण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी अपेक्षा होती.  मात्र, अनेक व्यावसायिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात शुल्क भरलेले नाही.  यात पालिकेचे नुकसान झाले आहे.

 

पालिकेकडून जागा व श्रेणीनुसार हे हस्तांतरण शुल्क आकारले जाते, यामध्ये विशेष स्टॉल उभारण्यासाठी अ+ श्रेणीसाठी 2 लाख, अ श्रेणीसाठी 1 लाख 50 हजार, ब श्रेणीसाठी 1 लाख आणि क श्रेणीसाठी 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर डीलरला 25 हजार फी भरावी लागणार आहे.  तर जे उसाच्या रसाचे स्टॉल लावतील, त्यांना १ लाख फी भरणे बंधनकारक आहे, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.