Pune News: मास्कसक्ती शिथिल पण हेल्मेटसक्तीचे आदेश, पुण्यात हेल्मेटचा वापर बंधनकारक

एमपीसी न्यूज – गेल्या दोन वर्षापासून कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्कची सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने गुरुवारी जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवले आहेत. तर मास्क देखील ऐच्छिक करण्यात आला आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरून जरी मास्क उतरला असला तरी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्क गेला परंतु डोक्यावर पुन्हा हेल्मेट आलंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी एक आदेश काढून शासकीय कर्मचारी शाळा-महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक केला आहे. त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळ, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या आणि दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

 

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, वाहन अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीमध्ये 80 टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकाचा तुलनेत दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट आहे. जितके दुचाकीचालक रस्ते अपघातात दगावतात त्यापैकी 62 टक्के व्यक्तींचा डोक्याला इजा झाल्यामुळे मृत्यू होतो.

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणार्‍या तसेच पाठीमागे बसणार्‍या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.