Pune News : महापालिकेतर्फे ५ जूनला ‘प्लॉगेथॉन २०२२’चे आयोजन; जनजागृतीपर सायकल रॅली

एमपीसी न्यूज – पर्यावरण दिनाच्या  निमित्ताने घनकचरा विभागातर्फे स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्लॉग-ए-थॉन उपक्रमाचे आयोजन ५ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत केले आहे. यासाठी शहरातील  १३४ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. 

 

प्लागेथॉनच्या माध्यमातून  जॉगिंग करताना कचरा उचलणे ही संकल्पना आहे. या अभियानात शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, कॉर्पाोरेट कंपन्या, महािवद्यालये, एनएसएस, एनसीसी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था, नेहरु युवा केंद्र, समग्र नदी परिवार अशा अनेक संस्था सहभागी होणार आहेत. अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी २९ मे रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . त्याचप्रमाणे शहरामध्ये होर्डिंग, पोस्टर, बॅनर, बस, व्हीएमडी स्क्रीन, रेडिओ आणि सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम असून, नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली.

 

नागरिकांनी सहभागी कसे व्हावे?

‘प्लॉग-ए-थॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयाला भेट द्यावी. ठरवून दिलेल्या मार्गावर चालणे, धावणे, रस्त्यावर दिसणारा सुका कचरा गोळा करणे, गोळा केलेला कचरा मार्गावरील महापालिका कर्मचा-याकडे सोपवणे आणि स्थानिक प्रतिनिधीसह स्वच्छतेची प्रतिज्ञा घेणे असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://www.pmc.gov.in/en/plogathon-2022-ward-wise-road-map या लिंकवर नाव नोंदवता येऊ शकते, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

 

प्लॅगेथॉन म्हणजे काय ?
प्लॅगेथॉनचा इंग्रजी अर्थ ‘अ कॉम्बिनेशन आॅफ जॉगिंग विथ पिकिंक अप लिटर’ असा आहे. पिक अप लिटर म्हणजे कचरा उचला आणि चाला. सकाळी नागरिक व्यायामासाठी बाहेर चालत निघाल्यानंतर कचरा उचलावा, असे यामध्ये अपेक्षित आहे. कचरा मुक्ती म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य ही साखळी लक्षात घेऊन प्लॉगिंगचे महत्व आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.