Pune News: ऑक्सिजनबाबत महापालिका होणार ‘आत्मनिर्भर’

ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टची संख्या लवकरच 12 वर,  10,583 लिटर/प्रति मिनिट (LPM) क्षमता

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणीही अधिक होती. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तत्परतेने नियोजन करत ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टची निर्मिती करायला सुरुवात केली असून दोन प्लान्ट प्रत्यक्ष सुरु झाले असताना लवकरच ही संख्या १२ पर्यंत नेण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. हे सर्व प्लान्ट कार्यान्वित झाल्यावर पुणे महापालिका ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहे, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गंभीर रुग्णसंख्या अजूनही कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येच्या तुलनेत घटलेली नाही. शिवाय तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. म्हणूनच पुणे महापालिकेच्या प्लांस्टची एकूण क्षमता 10,583 लिटर/प्रति मिनिट (LPM) पर्यंत जाणार आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे या कालावधीमध्ये ऑक्सिजनची मोठी गरज होती. ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने ऑक्सिजनचे नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मध्यम आणि मोठ्या मनपाचे हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविणे आवश्यक झाले. पुणे महानगरपालिकेमार्फत 8 हॉस्पिटलमध्ये 12 प्लांट बसविण्यात येत आहेत. यापैकी काही प्लांट अमेरिका, फ्रांस आणि नेदरलँडवरून मागविण्यात येत आहेत. तर काही प्लांट झिओलाईट (zealites) व इतर काही महत्वाचे पार्टस आयात करून भारतामध्ये बनविण्यात येणार आहेत’.

‘सर्व प्लांटमधून एकूण 10,583 लिटर प्रति मिनिट (सुमारे 20 टन प्रतिदिन) या दराने दररोज ऑक्सिजन निर्माण होणार असून तयार झालेला ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेकडे सध्या 40 टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करणेसाठी एकूण 7 टँक बसविण्यात आले आहेत’, असेही महापौर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.