Pune News : एकमेकांना समजून घेऊन काम केल्याने उद्यम बॅंकेची प्रगती : गिरीश बापट

एमपीसी न्यूज – इतर ठिकाणी एकमेकांची समजूत काढण्यात शक्ती खर्च होते मात्र उद्यम बॅंकेत एकमेकांना समजून घेऊन काम केले जाते, त्यामुळेच बॅंक प्रगती पथावर असल्याचे गौरवोद्गार खासदार गिरीश बापट यांनी काढले.

पुढील काळात सहकार क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर ही आव्हाने सहज पेलता येतील असे ही ते म्हणाले. सहकारी बॅंकांनी सामान्य व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करुन अडीअडचणीच्या काळात मदत केली आहे त्यामुळे सहकारी बॅंकांचे योगदान महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

बॅंकेच्या अध्यक्षपदी असताना महेश लडकत यांचे दु:खद निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चना लडकत यांची आज बॅंकेच्या स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बॅंकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी,तज्ञ संचालक दिनेश गांधी व महेंद्र काळे, बॅंकेचे माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, दिलीप उंबरकर, पांडूरंग कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष लीना अनास्कर, संचालक निरंजन फडके, मनोज नायर, गोकुळ शेलार, सीताराम खाडे, राजन परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. गिरीश बापट यांच्या हस्ते अर्चनालडकत यांचा संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बॅंकेच्या वतीने शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते खा. गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला.

माझे पती महेश लडकत यांची सर्व स्वप्न मी पूर्ण करेन असे भावनिक मनोगत श्रीमती अर्चना लडकत यांनी व्यक्त केले. मी बॅंकेच्या कामात जबाबदारीने लक्ष घालेन आणि उत्तम काम करेन असेही त्या म्हणाल्या.

बॅंकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संचालक संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.