Cyber Crime News : अनोळखी व्हिडीओ कॉल रिसिव्ह कराल तर तुम्हालाही ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं !

एमपीसी न्यूज – सायबर गुन्हेगारांनी आता अश्लील चित्रफीत तयार करून ती नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार सुरु केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 20 जणांना अनोळखी व्हिडीओ कॉल रिसिव्ह करणे चांगलेच भोवले असून त्यांनी याबाबत सायबर विभागाकडे तक्रार केली आहे. तुम्हाला या ब्लॅकमेलिंगमध्ये अडकायचे नसेल तर सावध व्हा आणि सतर्क रहा.

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप अशा सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून सायबर गुन्हेगार विशेषतः पुरुषांना बळी पाडत आहेत. मुलींच्या नावाने पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर अनोळखी मुली अथवा महिला संबंधित पुरुषासोबत चॅट करतात. चॅटिंगच्या माध्यमातून भुरळ घालून फोन नंबरची देवाणघेवाण केली जाते. व्हाट्सअपवर कनेक्ट झाल्यानंतर सायबर गुन्हेगार व्हिडीओ कॉल करतात.

व्हिडीओ कॉल स्वीकारल्यानंतर समोरची तरुणी अथवा महिला तिचा चेहरा न दाखवता स्वतःचे कपडे काढण्यास सुरुवात करते. कॉल करणारी महिला समोरच्या व्यक्तीला देखील निर्वस्त्र होण्यास परावृत्त करते. दरम्यान या सर्व प्रकाराचे व्हिडीओ स्क्रीन रेकॉर्डिंग केले जाते. त्याचा व्हिडीओ बनवून संबंधित व्यक्तीला पाठवून तो सोशल मीडिया, नातेवाईक आणि मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन हजारो रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे एक चुकीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे चांगलेच अंगलट येऊ शकते.

हा प्रकार शहरात तब्बल 20 जणांच्या बाबतीत घडला असून त्यांच्या तक्रारी पिंपरी-चिंचवड सायबर विभागाकडे आल्या आहेत. त्यांना देखील अशाच प्रकार अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंबर घेतला आणि व्हिडीओ कॉल करून अश्लील व्हिडीओ बनवला. त्याआधारे हजारो रुपयांची मागणी केली.

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून बदनामी टाळण्यासाठी खालील बाबींचे पालन करा 

# सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास संबंधित व्यक्तीची खातरजमा करा.

# फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारी व्यक्ती तुमच्या संपर्कातील, ओळखीतील आहे का हे तपासा. एकदा त्या व्यक्तीला अन्य माध्यमातून संपर्क करून फ्रेंड रिक्वेस्ट बाबत विचारून घ्या.

# पडताळणी केल्यानंतरच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा.

# सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत आपला सक्रिय असलेला मोबाईल क्रमांक शेअर करू नका.

# व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून येणारे व्हिडीओ कॉल स्वीकारू नका.

# अनोळखी व्यक्तीकडून व्हाईस कॉल आला असेल आणि नंतर व्हिडीओ कॉलची रिक्वेस्ट येत असेल तर ती स्वीकारू नका.

# ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडला असेल तर बदनामीच्या भीतीला घाबरून पैसे देऊ नका. एकदा पैसे दिल्यास सायबर गुन्हेगारांची हाव आणखी वाढते आणि त्यातून आणखी जास्त पैशांची मागणी केली जाते.

# असा प्रकार तुमच्या सोबत अथवा तुमच्या जवळपास कुठेही घडत असेल तर पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडे संपर्क साधा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.