Pune News : फी वसुलीचा तगादा लावणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजसमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

एमपीसीन्यूज : कोरोना संकट काळातही विद्यार्थ्यांनाकडून शंभर टक्के फी वसूलीसाठी तगादा लावणाऱ्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज व्यवस्थापनाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच महावियालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करीत जोरदार निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड व पुणे शहर यांच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयासमोर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सनी मानकर,   पुणे शहराध्यक्ष विशाल मोरे, पुणे विभाग अध्यक्षा संध्या सोनवणे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यश साने, आकाश हिवराळे, साहिल कांबळे, मुबीन मुल्ला, स्नेहल कांबळे,सौरभ माळी, कुणाल टेंगरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

महाविद्यालय सुरु होईपर्यंत फी आकारू नये, ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नाहीत त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करावे, फी अभावी कोणत्याही विधार्थ्याला ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये, तसेच त्यांचे लिविंग सर्टिफिकेट अडवू नये, ऑनलाईन परीक्षा पद्धती असताना ऑफलाईन परीक्षेचे शुल्क आकाराने बंद करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला आर्थिक संकटाचा सामना करावा लगत आहे. अशा परिस्थितीत पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काहीही सहकार्य केले जात नाही. महाविद्यालयाकडून अनेक वस्तू व सेवांचा वापर होत नसतानाही 100 टक्के फीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडे विद्यार्थी व पालक यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या. कोरोनाच्या या संकटकालीन परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी हिताचा विचार करत विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाविरोधात आंदोलन करण्यात आले.

कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटाने अनेकांचे रोजगार गेले, छोटे मोठे व्यवसाय बंद पडले. अशा परिस्थितीत संबंधित नागरिक जगण्याचा संघर्ष करीत आहेत. त्यांना फीसाठी तगादा लावू नये, अशी विनंती अनेक शाळा आणि महाविद्यालयांना करण्यात आली होती. काही शाळा आणि महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, काहींची मनमानी आणि मुजोरी सुरूच आहे. आगामी काळात शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना सहकार्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. यश साने : शहराध्यक्ष- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पिंपरी चिंचवड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.