Pune News : संकटात पुणे महापालिकेने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली : देवेंद्र फडणवीस

पुणे महापालिकेच्या कोरोना लढ्याचे फडणवीस यांच्याकडून कौतुक

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत पुणे शहर आणि जिल्हा मिळून रुग्णसंख्या मोठी होती. या वाढत्या रुग्ण संख्येचा ताण साहजिकच शहरावर आल्याचे पाहण्यास मिळाले. एवढ्या कठिण परिस्थिती देखील पुणे महापालिकेने अतिशय संवेदनशीलपणे काम केले. शिवाय पुणे शहराने टेस्टींगमध्ये कुठे ही कमतरता येऊ दिली नाही. पुणे, नागपुर या शहरात मोठ्या प्रमाणावर टेस्टींग झाल्याने रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे’, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या कामाचे कौतुक केले.

आता आपल्याला तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहावे लागणार असून त्या दृष्टीने तयारी करण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला.

पुणे महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यानिधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे लोकार्पण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटन सोहळ्यास ऑनलाईनच्या माध्यमातून भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भिमराव तापकीर सहभागी झाले, तर महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी नायडू हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मी पुणे महानगरपालिकेचे विशेष अभिनंदन करतो की, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या उपकरणाचा फायदा महापालिकेच्या सर्व रूग्णालयांना होणार आहे. ही चांगली बाब असून आता आपण ज्या लाटेतून जात आहोत. त्यावेळी आपल्या देशभरात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. त्याच दरम्यान ऑक्सिजन नाही, म्हणून अनेक घटना देखील झाल्या. त्याहीपेक्षा प्रशासनाला सतत दबावाखाली राहावे लागत होते. कारण चार तासाचा स्टॉक, दहा तासाचा स्टॉक एवढी तारेवरची कसरत करून ऑक्सिजन यायचा.

पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात जवळपास 800 प्लांट उभारले. त्याच दरम्यान देशातील प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनाचे वितरण योग्य प्रकारे केल्याने प्रत्येक भागात ऑक्सिजन जाऊ शकला. तसेच आता देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम केंद्र आणि तेथील राज्य सरकारच्या माध्यमांतून सुरू आहे. मात्र, या सर्वामध्ये पुणे महापालिकेने आघाडी घेतल्याने सर्वांचे विशेष कौतुक आहे. आता येणार्‍या काळात अशाच प्रकाराचे आणखी प्लांट आपल्या शहरात उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, आता आपल्याला तिसर्‍या लाटेची तयारी करावी लागेल. लहान मुलांना हा आजार होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेने पुढील तयारी करिता सज्ज राहून, त्या संदर्भात लागणारी साहित्य, तज्ञ डॉक्टर यांची टीम तयार ठेवा. जेणेकरून पुढील काळात अडचणी निर्माण होणार नाही.

सूत्रसंचालन बिडकर आणि रासने यांनी केले, तर आभार वाडेकर यांनी मानले

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरात सुरुवातीच्या काळात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने अधिकाधिक तपासण्या करण्यावर अधिक भर दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. मात्र यामध्ये आम्हाला ऑक्सिजन तुटवडा अनेक वेळा जाणवला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. आता येत्या काळात पुढील तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असून महापालिके मार्फत तयार करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.