Pune News : अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – अजित पवार

एमपीसी न्यूज – पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल. रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागितले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे बोलताना सांगितले.

रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या एका अल्पवयीन मुलीला टोळक्याने रेल्वे स्थानकाबाहेर नेले. तिथे तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार विविध ठिकाणी घडला असून यामध्ये रेल्वे कर्मचा-यांचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक आहे. या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. ”

“पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, ” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.