Pune News : चंद्रकांत पाटील यांचा एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळवारी पक्षाच्या बुथपासून प्रदेश स्तरापर्यंतच्या एक लाख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

बुथरचना आणि प्रमुख योजनेच्या जोरावर भाजप निवडणुकीत प्रचंड यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्त प्रत्येक बुथमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या 21 लाभार्थ्यांचा सत्कार करावा, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

भारतीय जनता पक्षातर्फे बुथपातळीपासून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. पक्षाचे 87,000 बुथप्रमुख, 16,000 शक्ती केंद्रप्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी अशा सर्व पातळ्यांवरील एक लाख कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संबोधित केले. या वेळी बुथरचना उपक्रमाचे संयोजक डॉ. रामदास आंबटकर आणि सहसंयोजक अरविंद निलंगेकर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या वेळी बुथप्रमुखांना संबोधित करताना म्हणाले की, प्रत्येक बुथचा प्रमुख, मतपत्रिकेच्या पानाचा एक प्रमुख असलेल्या 30 जणांची समिती आणि त्या-त्या पानावरील सहाजण अशी प्रत्येक बुथमधील 180 जणांची समिती स्थापन करायची आहे. राज्यात सर्वत्र पक्ष संघटना बळकटीचे हे काम सुरू आहे. त्याच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप प्रचंड यश मिळवेल.

ते म्हणाले की, बूथ समितीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती 25 सप्टेंबर या कालावधीत ‘सेवा आणि समर्पण सप्ताह’ साजरा करण्यात येईल. प्रत्येक बुथमधील केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांची यादी करून त्यांच्यापैकी 21 जणांचा सत्कार भाजपतर्फे करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2001 मध्ये सर्वप्रथम गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. यंदा त्यांच्या मुख्यमंत्री व पंतप्रधान या कारकीर्दीची 20 वर्षे पूर्ण होत असून 21 व्या वर्षांत प्रवेश होत आहे, हे महत्त्वाचे आहे. त्या निमित्ताने 21 लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. या खेरीज पक्षातर्फे सेवा आणि समर्पण सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.