Pune News : गणेश मंडळासाठी अनधिकृत वीज वापरल्यास कारवाई, अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – सार्वजनिक गणेश मंडळाच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. या तात्पुरत्या वीजवापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीज यंत्रणेची अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायरमधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायरचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी, असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाही, याची दैनंदिन तपासणी करावी.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास 24 तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.