Pune News : परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान

एमपीसी न्यूज – विविध अडचणींमुळे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. परीक्षेबाबत तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार असल्याचे विद्यापीठाने म्हंटले आहे.

या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विना अडथळा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार नाही. ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना आनलाईन पुनर्परीक्षा देता येईल. त्यांच्याकडे संगणक, लॅपटॉप आदी सुविधा नसल्यास महाविद्यालयांनी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

तक्रारी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर पुनर्परीक्षेबाबतची माहिती दोन नोव्हेंबरपर्यंत पाठविली जाईल. तक्रार केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी विद्यापीठाचा ई-मेल मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी तीन नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी लागणार आहे.

विद्यापीठाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. पण ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले. विविध अडचणींमुळे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने देता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.