Pune News : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीला आग; 3 कामगारांना वाचवण्यात यश

एमपीसी न्यूज – संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करणाऱ्या मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. यावेळी 3 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग विझविण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुुसार, मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या आवारातील नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली असल्याची दुपारी 1 च्या सुमारास माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी आगीचे बंब पाठविण्यात आले आहे. पोलीस फौजफाटा आणि अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कालव्यालगत हॅलीपॅड आहे. तेथील नवीन इमारतीला आग लागली असून आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.