Pune News : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कौशल्य विकास व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांचेमार्फत सूचिबद्ध 4 शासकीय आस्थापना प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 10 जून रोजी घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा वापर करुन त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करावे, याकरिता राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये सन 2021 करिता एक हजार उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग देणे प्रस्तावित आहे.

या कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित प्रशिक्षण हे प्राधान्याने शासकीय संस्थांमार्फत राबविण्यात येणार असून याकरिता पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय औंध, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जनरल हॉस्पिटल, बारामती, ससून जनरल हॉस्पिटल,यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पीटल या 4 शासकीय रुग्णालयांना, वैद्यकीय शिक्षण संस्थांना व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने On Job Training सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याकरिता सूचीबध्द शासकीय संस्थांची प्रशिक्षण क्षमता, प्रशिक्षणाची कार्यपद्धती, योजना राबविताना संभाव्य अडचणी आदी बाबत चर्चा करण्यात आली. On Job Training च्या माध्यमातून इस्पितळांना आवश्यक कुशल मनुष्यबळाचा पुरवठा सहजरित्या होणे शक्य असल्याने जिल्हयातील शासकीय इस्पितळांनी तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा. तसेच शासकीय रुग्णालयांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उत्तम दर्जा राखावा व प्रशिक्षणानंतर उमेदवारांना रोजगार प्राप्त होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व योजना यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिले.

या अनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या स्किल आणि एम्प्लॉयमेंट मिशन पुणे या फेसबुक पेजवर उपलब्ध लिंकचा वापर करुन मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.