Pune News : राज्यातील सराफांचा २३ ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप

एमपीसी न्यूज – ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार येत्या सोमवारी दि. 23 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी जाहीर केले.  

 

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत देखील केले. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती. परंतु, बीआयएसने शुद्धतेच्या 4 प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली. इतकेच नव्हे, तर ही आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले. सदर पद्धतीमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होणार आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, या आधी दागिना हॉलमार्क करताना बीएसआय लोगो, शुद्धता, हॉलमार्क सेंटर लोगो व ज्वेलर्सच्या दुकानाचे नाव किंवा लोगो छापला जात होता. त्यामुळे कोणत्या हॉलमार्क सेंटरवर शुद्धता तपासली गेली व कोणत्या दुकानामधून ग्राहकाने माल खरेदी केला हे ग्राहकाला समजत होते व काही कारणात्वव दागिन्यांची पावती हरविल्यास दुकानाच्या शिक्क्यावरून दागिने परत खरेदी करताना किंवा मोडताना व्यापारी सहज व्यवहार करीत होते. परंतु, नवीन एचयुआयडी पद्धतीने दागिन्यांवरील हॉलमार्क सेंटर व दुकानाचा लोगो काढून टाकण्यात आला असल्याने, त्यामुळे भविष्यात कोणाच्या दुकानातून माल खरेदी झाला हे समजणे अशक्य झाले आहे.

शिवाय एचयुआयडीमध्ये सहा आकडी नंबर असून त्याची नोंद ग्राहकाचे नाव व मोबाईल नंबर सहित बीआयएसच्या पोर्टलवर कायम स्वरूपी राहणार असल्याने ग्राहक व व्यापा-यांच्या गोपनीयतेला देखील बाधा येणार आहे. विशेष म्हणजे यामुळे गोपनीय माहिती व वैयक्तिक माहिती व व्यवसायामध्ये मोठा हस्तक्षेप केला जात आहे.

याबरोबरच 16 जून 2021 पासून भारतातील 741 जिल्ह्यांपैकी फक्त 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग करणे अनिवार्य केले आहे. कुठलाही सक्तीचा कायदा करताना एकास एक व दुस-यास एक असा न्याय करणे, हे भारतीय संविधानातील तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे आमचा याला देखील विरोध आहे. शिवाय सध्याची हॉलमार्क सिस्टीम ही अत्यंत हळू असून यापूर्वी एका दिवसात होणारे हॉलमार्किंग यामुळे आज 5 ते 10 दिवस घेते. याचा व्यवसायावर परिणाम होऊन, ग्राहकांची नाराजी देखील यासाठी सहन करावी लागत असल्याचे, रांका यांनी सांगितले.

भारतामध्ये ज्वेलर्सनी हॉलमार्कचे स्वागत केले व अजूनही करीत आहेत. मात्र, एचयुआयडीचा दागिन्यांच्या शुद्धतेशी कोणताही संबंध नाही व ही प्रक्रिया देखील विध्वंसक आहे, असे सांगत रांका पुढे म्हणाले की, अद्यापही देशातील कोट्यावधी दागिने हॉलमार्क करणे बाकी आहे. हॉलमार्क सेंटर, एचयुआयडी प्रक्रियेमुळे पूर्वीप्रमाणे काम करू शकत नाही. त्यामुळे भारतामधील संपूर्ण दागिन्यांचा स्ट्रॉक व प्रत्येक वर्षी वाढणारा स्ट्रॉक असा संपूर्ण स्ट्रॉक हॉलमार्किंग करण्यासाठी तब्बल 800 ते 900 दिवस लागणार आहेत. याबरोबरच एचयुआयडी करताना प्रत्येक दागिन्याच्या नगाला 35 रुपये प्रमाणे चार्जेस लागत होते. पण नवीन प्रक्रियेमुळे एचयुआयडी सेंटरने प्रत्येक दागिन्याच्या नगाला 150 रुपये प्रमाणे मागणी केली आहे. परिणामी याचा खर्च ग्राहकांवर पडून नाहक दागिन्यांची किंमत वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन हॉलमार्किंग प्रक्रियेत दागिने कापणे, वितळवणे आणि स्क्रॅप करणे समाविष्ट आहे, जो विकण्याचा देखील हेतू आहे. दागिन्यांचे नुकसान झाल्यावर हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया ही पराभूत होते. पुढे ही प्रक्रिया त्वरित ग्राहक अनुकूल सेवा काढून टाकते, जी या क्षेत्राची सर्वांत मोठी युएसपी आहे. दागिन्यांमधून ज्वेलर्सचे नाव काढून टाकणे, ग्राहकांना ज्वेलर्सची ओळख नसताना विकण्याची किंवा देवाण घेवाण करण्याची इच्छा असेल, तेव्हा ग्राहकांच्या हितासाठी देखील ती हानीकारक ठरेल. दागिन्यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे हॉलमार्किंग पॉइंट ऑफ सेलवर आधारित असावे. तर स्टोरेज, डिस्प्ले, ट्रांझिट, एक्झिट टू सेल, मॅन्युफॅक्चरिंग इत्यादी सर्व अॅप्लिकेशन बीआयएस अॅक्ट आणि रेग्युलेशन मधून काढून टाकावेत. याबरोबरच हॉलमार्किंगच्या नवीन मार्किंग प्रक्रियेत अपरिवर्तनीय अनुपालनामुळे केवळ ग्राहकच त्रस्त होत नाहीत, तर सुवर्णकार उद्योगाच्या उपजीविकेवर अवलंबिलेले 5 कोटी नागरिक देखील धोक्यात येतील, असेही रांका यांनी नमूद केले.

यानंतर ज्वेलर्सवर दंडात्मक, गुन्हेगारी फौजदारी केस दाखल करणे, ज्यांनी दागिने तयार केले नाहीत किंवा हॉलमार्क केले नाहीत अशांवर केस करणे, अशा इन्स्पेक्टर राजला सुरुवात झाली असून या भीतीने व्यवसाय बंद होतील, अशी आम्हाला भीती आहे. दिवाणी गुन्ह्यांसाठी नोंदणी रद्द करण्याच्या कठोर तरतुदी व्यापा-यांवर लादल्या जातात. एका बीआयएस अधिका-याच्या धाकाने व्यवसाय बंद पडून त्यावर आधारीत लाखो कर्मचारी, कारागीर व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण उपजीविकेचे नुकसान होते. याबरोबरच भारतीय दागिना हा एक कलाप्रकार आहे व ते एकसंध नाहीत, म्हणून उद्योगाने दर्जेदार दागिने देण्याच्या वचनबद्धतेसाठी 22 kt – 916 ते 918 या मानक वाढीसाठी शिफारस देखील शिफारस केली आहे. बीआयएस कायदा तयार करताना हॉलमार्किंग वरील नीती आयोगाच्या अहवालाला बेंचमार्च मानण्याची ज्वेलरी उद्योगाची सततची मागणी असूनही तिला विचारात घेतले जात नाही, याकडे देखील लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.