Pune News: भाषेच्या सौंदर्याने नटलेलं साहित्य मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे – प्रा. मिलिंद जोशी

एमपीसी न्यूज – करोना काळात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, तेव्हा पालकांच्या लक्षात आले, की घरात पासबुक आहे, चेक बुक आहे; पण वाचण्यासाठी बुक नाही. नवीन तंत्रज्ञान हे वापरण्यासाठी असतं. माणसं प्रेम करण्यासाठी असतात, पण आपण तंत्रज्ञानावर प्रेम करू लागलो आणि माणसांचा वापर करू लागलो. हे वाईट आहे. हे टाळून भावसंपन्न पिढी घडवायची असेल, तर भाषेच्या सौंदर्याने नटलेलं साहित्य मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

अक्षरभारती व  अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती केलेल्या बालकुमार अक्षर दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ न म जोशी, ज. गं. फगरे, बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे,  अंकाचे मुख्य संपादक माधव राजगुरू, संपादक  श्रीकांत चौगुले ,माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जोशी म्हणाले, की साहित्यक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था एकमेकांना पूरक काम करत असतात; पण त्या संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. लहानपणी पहिल्यांदा श्रवण संस्कार घडतात. मुलांच्या कानावर चांगलं काही पडलं पाहिजे. श्रवणातून संस्कार घडला पाहिजे. त्यासाठी अनेक संस्थांनी मिळून साहित्यानंद  अभिवाचनाचा कार्यक्रम करून, तो अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल.’

डॉ. न. म. जोशी म्हणाले की, ‘मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे काम हे शेतकऱ्यासारखे मूलभूत स्वरूपाचे असते. सध्या कोरोना हा केवळ जैविक क्षेत्रात नाही, तर सांस्कृतिक क्षेत्रातही कोरोनाची लागण झाली आहे. त्यावर मात करायची असेल तर मूल्यसंस्काराची लस दिली पाहिजे. उद्याच्या पिढीकडून चांगलं काही घडावं असं वाटत असेल तर मुलांमध्ये मूल्यांची रुजवण करणे गरजेचे आहे.’

फगरे यांनी शुभेच्छा दिल्या तर डॉ संगीता बर्वे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविकात श्री. राजगुरू यांनी दिवाळी अंकाची सुरुवात एकशे बारा वर्षांपूर्वी झाली असली, तरी या परंपरेत संपूर्णपणे जाहिरातविरहित असा हा पहिला अंक असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. तसेच त्यांनी अंकाची वैशिष्ट्ये सांगितली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत प्रांजली बर्वे यांनी सादर केले. श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले. बालकुमार संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ दिलीप गरुड यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.