Pune News: कोरोनानंतर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले – डॉ. नितीन करमळकर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आयुर्वेदाचे महत्त्व जगाला कळाले आहे. डोळे, कान, नाक- घसा या संदर्भात जे डॉक्टर काम करतात, त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे सुरू असलेले काम आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर असल्याचे, मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे  ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत आज शनिवार (दि. 30) आणि उद्या रविवार (दि.1) मे अशा दोन दिवस वैद्यकीय परिषदेचे पुण्यातील राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी येथील हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये आयोजन
करण्यात आले आहे. या परिषदेचे कुलगुरू डॉ. करमळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. मानसी बोरकर यांनी धन्वंतरी स्त्रोत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी ‘सिनर्जी 2022’ या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार,  असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे,  डॉ. दिलीप पुराणिक,  डॉ. मंजिरी केसरकर, डॉ. राधेश्याम झेंडे, डॉ. मधुसुदन झंवर, डॉ. संदीप निमसे, डॉ. समीर रासकर, डॉ. अभिजीत आग्रे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शलाकीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या निवृत्त प्रा. हरी उमाळे, डॉ. समीर रासकर, डॉ. विरेय्या हिरेमठ यांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

‘सिनर्जी 2022’ या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार म्हणाले” 2016 मध्ये झालेल्या वैद्यकीय परिषदेमध्ये ‘सिनर्जी 2022’ असे नाव आणि थीम देण्यात आली. 2016 पासून अशा वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले जात आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षे यामध्ये खंड पडला होता. मात्र, त्याच उत्साहात यावर्षी परिषद होत आहे. या परिषदेमध्ये विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. नवीन सर्जनसाठी अत्याधुनिक माहिती आणि दिशा मिळावी, सर्जरीचे काम कसे असते. यामध्ये बिन टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेजर सर्जरी याचा सविस्तर अभ्यास आणि चर्चा होणार आहे. पदव्युत्तर विद्यार्थी आणि त्यांनी केलेला अहवाल कसा उपयुक्त आहे अथवा होणार आहे, याची माहिती दिली जाणार आहे. तसेच या परिषदेच्या माध्यमातून नव- नवीन उपकरणांची माहिती मिळणार आहे. ”

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे म्हणाले” दोन दिवस ही परिषद होत आहे. या परिषदेमध्ये 600 पेक्षा जास्त शलाकी सहभागी झाले आहेत. तसेच प्रदर्शनामध्ये 20 स्टाॅल उभारण्यात आले आहेत.  डोळ्यांच्या संदर्भात अत्याधुनिक उपकरणे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. चार हाॅलमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र होत आहेत. उद्या (रविवार) सकाळी 8 वाजता शेठ ताराचंद रुग्णालयामध्ये डोळ्यांवरील नाजूक शस्त्रक्रिया होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण वैद्यकीय परिषदेमध्ये केले जाणार आहे. विशेष पुस्तकाचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. सर्व शलाकींना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण खाडे आणि डॉ  मयूरेश कुलकर्णी  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.