Pune News : जम्बो कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांसोबत महापौरांनी साधला संवाद

रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली परिस्थिती

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदघाटन केलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका अधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी येथे उपचार घेत असलेल्या रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर आणि अधिकाऱ्यांनी पीपीई किट परिधान केले होते.

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते आणि सुविधा मिळत नाहीत, असे तक्रारींचे स्वरूप होते.

या पार्श्वभूमीवर जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती नेमकी काय आहे ?, इथली यंत्रणा कशी आहे ?, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आज महापौरांनी थेट जम्बो रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या आहेत.

आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असून या रुग्णालयात आता समाधानाची स्थिती आहे. संबंधित एजन्सीवर कारवाईदेखील केली जाणार असून नव्या एजन्सीची नेमणूक केली असल्याचे महापौर म्हणाले.

जम्बो हॉस्पिटलमध्ये सध्या 178 कोविड रुग्ण उपचार घेत असून यापैकी काही रुग्णांची महापौरांनी भेट घेतली. रुग्णांलयात मिळणाऱ्या सोई-सुविधा आणि उपचारांबद्दल चर्चा केली. यावरून रुग्णांमध्ये समाधान असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे.

याआधी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यावर आपल्या सुचनेनुसार दिवसातून तीन वेळा नातेवाईकांना संपर्क साधता येण्याची सुविधा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपलब्ध केली असून नातेवाईकांना सद्यस्थितीची माहिती दिली जाते.

उपलब्ध औषधे आणि ॲम्ब्युलन्स याचीही माहिती घेतली आहे. शिवाय रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचीही स्थिती स्वतः समजून घेतली. एकूणच परिस्थिती स्थिरावत असल्याचे चित्र असल्याचे महापौर म्हणाले.

दोन दिवसांत आणखी 100 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार

येत्या दोन दिवसांत आणखी 100 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार असून आयसीयू बेड्सची संख्या 60पर्यंत नेण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु होत आहे.

रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक बैठक घेऊन विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.